#

Advertisement

Saturday, January 20, 2024, January 20, 2024 WIB
Last Updated 2024-01-20T11:51:28Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

घरांना शिंदेंनी केलेला विरोध सोलापूरची गरीब जनता विसरणार नाही

Advertisement

माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी केले स्पष्ट 

सोलापूर : शहरातील असंघटित कामगारांसाठी आशेचा किरण समजला जाणारा देशातील सर्वात मोठा कामगार वसाहत प्रकल्प पूर्णत्वास आला. मात्र, याच प्रकल्पाला केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी अडथळा आणला होता, ही बाब सोलापूरची गरीब जनता कधीही विसरणार नाही. याउलट मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) आणि भाजपची विचारधारा अशा दोन विचारांचे पक्ष असताना देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृष्टी दाखवत कामगारांच्या घराची गरज ओळखली. आज, रे-वसाहत आणि भाजप हे नाव कायमचे जोडूले गेले आहे, असे या प्रकल्पाचे प्रवर्तक, माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी सांगितले.
सोलापूर शहरातील तब्बल 30000 घरांच्या रे-नगर प्रकल्पातील तयार 15000 घरांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. हा प्रकल्प पूर्ण होत असताना यामागील राजकीय अडचणी आणि माजी आमदार नरसय्य आडम मास्तर यांची यामागील कष्टप्रद कार्य लक्षवेधीने जाणून घेतले. याबाबत आडम मास्तर मोकळेपणाने बोलताना म्हणाले की, गरीब गरूजूंच्या घरासाठी मी प्रयत्न सुरू केले होते. त्यावेळी 2014ला लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आल्या होत्या. त्यावेळी केंद्रात सुशीलकुमार शिंदे हे गृहमंत्री होते तर त्यांची कन्या प्रणिती या सोलापूरच्या आमदार होत्या. मी विधानसभा लढविणार असल्याकारणाने सोलापूर मध्य मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांच्या विजयात मी मोठा अडथळा ठरणार, या राजकीय विचारातून मी मांडलेल्या राजीव आवास योजनेतील कामगार वसाहतीच्या प्रकल्पाला विरोध करण्यास शिंदे यांनी सुरुवात केली.
आडममास्तर म्हणाले की, सोलापुरातील रे-नगरचा प्रकल्प पूर्ण झाला तर याचे श्रेय मला मिळून मी निवडून येईल आणि प्रणिती शिंदे यांचा पराभव होईल, या विचारातून सुशीलकुमार शिंदे यांनी त्यावेळी रे-नगर प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून मिळणार्‍या 1.5 लाख रुपयांच्या अनुदानाच्या फाईलवर अंतिम सही करू नये, यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर दबाव आणला आणि हा प्रकल्प रखडला. त्यावेळी 2014च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सोलापुरात काँग्रेसकडून रे-नगर प्रकल्पाविरोधात प्रचार सुरू झाला. आडममास्तर यांनी घरांच्या नावाने कामगारांची लूट केल्याचे आरोप प्रणिती शिंदे यांनी केले. 25 ते 30 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोपही केला. या प्रकरणावर तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांकडे चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली होती. यामुळे या प्रकल्पाविरोधात उलटसुलट चर्चा आणि कामगारांमध्ये संभ्रमाचे वातावरण काँग्रेसने तयार केले. नोव्हेबर 2013 मध्ये प्रणिती शिंदे यांनी माझ्या विरोधात मोर्चा काढला, या मोर्चामध्ये गृहनिर्माण योजनेसाठी गोळा केलेले कामगारांचे पैसे परत द्यावेत, अशी मागणी केली. त्यानंतर 2014 मध्ये निवडणुका जाहीर झाल्या. यावेळी मी सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढवत होतो. मात्र, काँग्रेसने केलेल्या रे-नगर प्रकल्पाच्या अप्रचाराविरोधामुळे माझा पराभव झाला. परंतु, पुढे केंद्राप्रमाणे राज्यात सत्तांतर झाले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी या प्रकल्पासाठी पुन्हा प्रयत्नपूर्वक पाठपुरावा केला. फडणवीस यांनी संबंधीत अधिकार्‍यांच्या बैठका घेत रे-नगर प्रकल्प मार्गी लावण्याच्या सूचना केल्या दिल्लीतही भाजपनचे सरकार असल्याकारणाने केंद्राच्या अनुदानाच्या पुढील प्रक्रियाही सोप्या झाल्या आणि पंतप्रधान मोदी यांच्याच हस्ते या प्रकल्पाची सुरूवात करण्यात आली, त्यातील 15 हजार घरांचे लोकार्पणही मोदी यांच्या हस्ते आता करण्यात आले. गरीब गरजूंना हक्काचे घर मिळाले, याचा आनंद होतो. परंतु, घराला विरोध करणार्‍या सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्या राजकीय विरोधाला ही जनता कायम लक्षात ठेवेल, असेही आडम मास्तर यांनी स्पष्ट केले.