Advertisement
सुप्रिया सुळे यांचं उत्तर काय?
मुंबई : राष्ट्रवादीच्या फुटीचं प्रकरण सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगात गेलं. त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील दरी अधिकच वाढली. त्यातच अजितदादांनी वयाचा मुद्दा काढून पवारांवर वारंवार हल्ला चढवला. त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील दरी वाढत गेली. ती एवढी की जिथे शरद पवार असतील त्या कार्यक्रमात जाणं अजितदादांनी टाळण्यास सुरुवात केली आहे. त्यावर, खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
साखर कारखान्याचा कार्यक्रम असो की मराठी नाट्य संमेलन असो, दोन्ही ठिकाणी शरद पवार आणि अजित पवार यांना निमंत्रण होतं. पण कोणताही कार्यक्रम न चुकवणाऱ्या अजितदादांनी या दोन्ही कार्यक्रमांना दांडी मारली आहे. केवळ शरद पवार या कार्यक्रमांना असल्यामुळे अजितदादांनी या कार्यक्रमांना जाणं टाळलं आहे. यावर सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्यांनी सावध विधान केलं आहे. शरद पवार असणाऱ्या कार्यक्रमात अजित पवार का जात नाही? हे अजित पवारच सांगू शकतात, मी नाही, अशी सावध प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. सुप्रिया सुळे यांच्या विधानाने अजितदादा मुद्दाम पवार असलेल्या कार्यक्रमात जात नसल्याचंही अधोरेखित झालं आहे.
