Advertisement
सावली फाउंडशेन आणि ड्रीम फाउंडशेनचे आयोजन
सोलापूर : जागतिक मिलेट तृणधान्य वर्ष म्हणून यंदाचे वर्ष साजरे होत आहे. यापार्श्वभूमीवर सावली फाउंडशेन आणि ड्रीम फाउंडशेन यांच्या संयुक्त विद्यमाने बालाजी अमाईन्स, बालाजी सरोवर आणि चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा,लि., यांच्या सहकार्याने सोलापूरमध्ये पहिल्यांदाच मिलेट महोत्सव आणि अस्सल सोलापुरी हुरडा पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम, हळदी-कुंकू तसेच मिलेट पाककला अशा स्पर्धांची रेलचेलही असणार आहे, असे सावली फाउंडशेनच्या अध्यक्षा अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे आणि काशिनाथ भतगुणकी यांनी सांगितले.
हॉटेल बालाजी सरोवर येथे बुधवारी (दि.31) सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत हा महोत्सव होणार आहे. महिलांनी व कृषी उत्पादक कंपन्यांनी तृणधान्यापासून बनविलेले विविध पदार्थ याचे प्रदर्शन व विक्री या माध्यमातून होणार आहे. याशिवाय शेतकर्यांच्या उत्पन्न वाढीसाठी शेतकरी ते थेट ग्राहक होणारी हुरडा पार्टी या महोत्सवाचे खास आकर्षण आहे. हुरडा ही सोलापूरची ओळख आहे. संपूर्ण देशात आणि जागतिक पातळीवर हुरडा पोहोचवण्यासाठी ड्रीम फाउंडेशनचे काशिनाथ भतगुणकी हे सातत्याने प्रयत्न करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर आयोजीत करण्यात आलेल्या महोत्सवात ज्वारीसह बाजरी, नाचणी, बगर यापासून बनविलेले पदार्थही विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत.
या महोत्सवाचे उद्घाटन बालाजी सरोवर पृथ्वी हॉल येथे बुधवारी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या हस्ते तसेच उद्योजक राम रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. बसवारुढ मठाचे शिवपुत्र महास्वामीजी, अक्कलकोट श्री स्वामी समर्थ देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. दिवसभर होणार्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. हैदराबाद येथील श्रीराम बाबू तसेच बार्शीचे शंतनू पाटील हे मिलेट प्रक्रिया यावर मार्गदर्शन करणार आहेत. मिलेट महोत्सवातून सोलापूरचे खाद्यपदार्थ, सांस्कृतिक कार्यक्रम व स्नेहमेळावा व प्रेरणादायी कार्यक्रम होऊन महिलांना उद्योग व स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न असल्याचे स्वागताध्यक्ष अॅड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी सांगितले.


