Advertisement
मुंबई : राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्राच्या एकूण 6 जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी 28 फेब्रुवारीला मतदान होणार आहे.
या निवडणुकीत एका जागेसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. पण आता सूत्रांकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यसभेची ही निवडणूक आता बिनविरोध होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या निवडणुकीसाठी येत्या 28 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा गट निवडणुकीत उमेदवार न देण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप 3, शिवसेना शिंदे गट 1, राष्ट्रवादी अजित पवार गट 1 आणि काँग्रेस 1 असे उमेदवार राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.राज्यसभेतील महाराष्ट्राच्या 6 खासदारांचा कार्यकाळ येत्या मार्च महिन्यात संपणार आहे. त्यामुळे या 6 जागांसाठी राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. या 6 खासदारांमध्ये भाजपचे 3, ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या प्रत्येकी एक खासदारांचा समावेश आहे.
