Advertisement
- सावली फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
- विद्यार्थिनींना आरोग्यविषयक मार्गदर्शन व विविध स्पर्धांचे आयोजन
सोलापूर : मासिक पाळी स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्याबद्दल जेवढी चर्चा होईल, तेवढे याबद्दल असणारे गैरसमज दूर होतील. मासिक पाळी शाप नाही तर निसर्गाने स्त्रीला दिलेलं वरदान आहे, याचा प्रत्येक स्त्रीला अभिमान असला पाहिजे, असे प्रतिपादन सावली फाउंडेशनच्या अध्यक्ष ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी केले.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सावली फाउंडेशनच्या वतीने किशोरवयीन मुलींसाठी ‘ऋतुपर्ण-एका बदलत्या ऋतूच्या वळणावर’ या आरोग्यविषयक मार्गदर्शन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा परीविक्षा अधिकारी सौ. वैशाली राजेभोसले व महिला व बाल कल्याण अधिकारी मा. रमेश काटकर, तसेच मार्गदर्शक तज्ज्ञ म्हणून प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. किरण सारडा, डॉ. गिरीश कुमठेकर, डॉ. बकुळ जहागीरदार व डॉ. सुप्रिया जाधव उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर कोमलताई साळुंखे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात डॉ. सुप्रिया जाधव यांनी मासिक पाळीत घ्यावयाची काळजी, याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. तसेच डॉ. किरण सारडा, डॉ. गिरीश कुमठेकर व डॉ. बकुळ जहागीरदार यांनी मासिक पाळीबद्दल महिलांमध्ये व समाजामध्ये असलेले समज-गैरसमज, किशोरावस्था म्हणजे काय? गर्भाशयाचा कॅन्सर, त्यांची लक्षणे, तो कशामुळे होतो व त्यावरील उपचार याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले.
यावेळी सावली फाउंडेशनच्या वतीने महिला व मुलींसाठी lucky draw तसेच विविध स्पर्धांचे योजन करण्यात आले होते. विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे कुलर, मिक्सर व रोटी मेकर तसेच इतर अनेक बक्षिसांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यापुढे अशाच प्रकारे सावली फाउंडेशनच्या माध्यमातून सभासद महिलांसाठी आरोग्य शिबिरे, मुलींना शैक्षणिक मार्गदर्शन, महिलांना व्यवसाय प्रशिक्षण, तसेच मनोरंजनाचे विविध उपक्रम वर्षभर राबविण्यात येणार असल्याची माहिती कोमलताई साळुंखे यांनी दिली.
कार्यक्रमास शालेय विद्यार्थिनी, महिला, पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




