#

Advertisement

Wednesday, April 3, 2024, April 03, 2024 WIB
Last Updated 2024-04-03T11:20:58Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

बहुजन रयत परिषद घेणार "दे धक्का"ची भूमिका

Advertisement

राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांची पुण्यात महत्त्वाची बैठक 

सोलापूर : राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून उमेदवार जाहीर होत आहेत. लोकसभेच्या 48 मतदार संघात बहुतांशी उमेदवारांची धक्कादायक नावे समोर आली असल्याने मतदारांत नाराजीचा सूर आहे.  सोलापूर लोकसभा मतदार संघही त्यापैकी एक आहे. विशेष म्हणजे नको तो उमेदवार नागरिकांवर लादला गेल्याने त्याला विरोध करण्यासाठी छोटे-मोठे पक्ष तसेच संघटना पुढे सरसावल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यासह राज्यभरात चांगली ताकद असलेली बहुजन रयत परिषदही धक्कादायक तंत्राचा अवलंब करणार असल्याची चर्चा आहे. यासाठी परिषदेची तातडीने महत्त्वपूर्ण बैठक पुणे येथे गुरुवार, ता. 4 एप्रिलला आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये आगामी राजकीय भूमिका ठरणार आहे. 

सोलापूर लोकसभा मतदारसंघात किमान 20 उमेदवार इच्छुक असताना भारतीय जनता पक्षाने बाहेरील उमेदवार लादला असल्याची भावना मतदारांत निर्माण झाली आहे. त्यातच, सोलापुरात काँग्रेसने महिला उमेदवार दिल्याने भाजपकडूनही महिला उमेदवार दिला जाईल, असा ठाम विश्‍वास असताना पुरूष उमेदवार देवून भाजपने महिला उमेदवारांच्या अपेक्षांवर पाणी फिरवले आहे. भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढविण्यसाठी दोन महिला उमेदवार प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या. यामध्ये बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. कोमलताई लक्ष्मणराव ढोबळे-साळुंखे यांचे नाव आघाडीवर होते किंबहुना भाजपच्या दुसर्‍या (ब) यादीत महिला उमेदवार द्यायचा झाल्यास उमेदवारी अ‍ॅड. कोमलताई यांनाच जाहीर होणार होती. परंतु, सोलापुरात पुरूष उमेदवार दिला गेला, त्यातच बाहेरील उमेदवार लादला गेल्याने बहुजन रयत परिषदेच्या पदाधिकारी आणि कार्यर्त्यांनीही तिव्र संताप व्यक्त केला. सोलापूरचा उमेदवार भाजपने बदलावा, अशी मागणी होत असताना असा उमेदवार दिल्याने याबाबत सर्वत्र नाराजीही व्यक्त केली जात आहे. 

सोलापुरात भाजपकडून ज्यांना-ज्यांना उमेदवारी डावलली गेली त्यांना बहुजन वंचित आघाडी तसेच एमआयएमने सोलापुरातून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी आमंत्रित केले आहे. यामध्ये बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. कोमलताई लक्ष्मणराव ढोबळे-साळुंखे यांच्याही नावाचा समावेश आहे. परंतु, अ‍ॅड. कोमलताई ताई यांचे पिताश्री लक्ष्मणराव ढोबळे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ढोबळे यांना मुंबई येथे बोलावून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, फडणवीस यांनी ढोबळे यांना कोणतेही ठोस आश्‍वासन दिलेले नाही. त्यामुळे अ‍ॅड. कोमलताई यांनी तरी आता वेगळी भूमिका घ्यावी, अशी मागणी बहुजन रयत परिषदेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून केली जावू लागली आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहानुसार बहुजन रयत परिषद संघटनेची राज्यव्यापी आढावा बैठक गुरुवारी, ता 4 एप्रिलला दुपारी एक वाजता, भोसरी येथे आयोजीत करण्यात आली आहे. यावेळी राज्य कार्यकारणी पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष, सचिव, कार्याध्यक्ष, संपर्कप्रमुख, जिल्हाध्यक्ष, जिल्हा सचिव, जिल्हा कार्याध्यक्ष, जिल्हा संपर्कप्रमुख, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष आदी उपस्थित राहणार आहेत.  

दरम्यान, सदर बैठकीत परिषदेची महत्त्वाची भूमिका ठरविण्यात येणार असल्याने बैठकीस पदाधिकार्‍यांनी उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे प्रदेश सरचिटणीस ईश्वर क्षीरसागर यांनी सांगितले.