Advertisement
अकलूज : राजकारणात कधीच कुणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र असत नाही. याचाच अनुभव रविवारी पुन्हा एकदा अकलूजच्या विजयसिंह मोहिते पाटलांच्या शिवरत्न बंगल्यावर आला.आजच्या स्नेहभोजनामुळं केवळ माढाच नाही, तर सोलापूर लोकसभा मतदारसंघातली राजकीय समीकरणंही बदलली जाणार आहेत. सोलापुरातून शिंदेंची कन्या प्रणिती शिंदे या लोकसभा निवडणूक लढवत आहेत. एवढंच नाही तर सातारा आणि बारामतीतही याचा परिणाम होऊ शकतो, असा जाणकारांचा अंदाज आहे.
साधारण पाच वर्षांपूर्वी मोहिते पाटलांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपचं कमळ हाती घेतल. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता पवार आणि मोहिते पाटलांनी पुन्हा एकदा एकमेकांचा हात हातात घेतला आहे. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे देखील २००९ नंतर प्रथमच मोहिते पाटलांच्या घरी आले. शिंदे मुख्यमंत्री असताना विजयदादा त्यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकाच जिल्ह्यातील असण्याची महाराष्ट्राच्या राजकारणातील ती पहिलीच वेळ होती. त्याशिवाय शेकापचे जयंत पाटील, बाबासाहेब देशमुख, प्रवीण गायकवाड, करमाळाचे शिंदे समर्थक माजी आमदार नारायण पाटील देखील स्नेहभोजनासाठी पोहोचल्यानं महायुतीला जोर का झटका बसलाय आहे. गेल्यावेळी मोहिते पाटलांमुळं माढ्यामध्ये भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना दीड लाखांचं मताधिक्य मिळालं होतं. आता रणजितसिंहांच्या विरोधात मोहितेंनी बंडाचं निशाण फडकवलंय. माढामधून धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत.
