Advertisement
एका रात्रीत तुला आमदार केलं परत बीड पाठवण्याची ताकद आहे
अकलूज : माढा लोकसभा मतदारसंघ आता राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकाळात असलेली काँग्रेसमधील दुसरी फळी पुन्हा आपल्याकडे वळून घेण्याचे प्रयत्न शरद पवार यांच्याकडून केला जातोय. अशातच पश्मिच महाराष्ट्रातील केंद्रस्थान असलेल्या माढ्यात आता मोहिते पाटील कुटूंबियांना शरद पवारांनी हाताशी धरलंय. वाढत्या असंतोषाचा फायदा घेत शरद पवारांनी चालाख खेळी केली अन् माढ्याचं राजकीय समीकरण फिरवलं. धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपला नारळ दिला अन् राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश केला. त्यावेळी बोलताना मोहिते पाटलांनी थेट राम सातपुते यांना तंबी दिली आहे. मी फक्त एकच सांगतो. दादांच्या सांगण्यावरून एका रात्रीत तुला आमदार केला. तुला एकच सांगतो. एका रात्रीत तुझं पार्सल माघारी बीडला पाठवायची ताकद आमच्यात हाय, असं म्हणत धर्यशील मोहिते पाटील यांनी राम सातपुते यांना थेट इशारा दिला आहे. मोहिते पाटलांनी राम सातपुते यांना थेट इशारा दिल्याने आता माढ्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे.
दरम्यान, माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना मोहिते पाटलांनी साथ दिली अन् राम यांचं आमदार व्हायचं स्वप्न पूर्ण झालं. देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील नेते म्हणून राम सातपुते यांचं नाव घेतलं जातं. माळशिरसमधून फडणवीसांनी राम सातपुते यांचं नाव पुढं केल्याने मोहिते पाटलांनी साथ देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, राम सातपुते यांच्यामुळे आता आपल्या गडाला तडा जाण्याचा धोका मोहिते पाटलांना वाटू लागलाय. त्यामुळे आता माढ्यात कोणाचा करेक्ट कार्यक्रम होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
