Advertisement
नाशिक : नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरत नाही. आता या जागेवरुन महायुतीत पुन्हा एकदा ट्विस्ट आलंय. नाशिक लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा कायम असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटल आहे. नाशिकच्या जागेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून हेमंत गोडसे आणि अजय बोरस्ते इच्छुक आहेत. सुरुवातीला छगन भुजबळांनाच उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरु होती. पण भुजबळांनी आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली होती. मात्र आता भुजबळांनी पुन्हा राष्ट्रवादीचा दावा सांगितला आहे. त्यातच नाशिकची जागा छगन भुजबळांनी लढवावी असा ठराव समता परिषद, ओबीसी संघटनांनी केला आहे.. तर भुजबळांनी घ्याव्या लागलेल्या माघारीचे पडसाद माळी समाजातही उमटत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी आपल्याला उमेदवारी दिल्याचा पुन्हा एकदा उल्लेख भुजबळांनी केला आहे. केंद्रीय नेत्यांना आपली गरज होती, त्यांनीच आपलं नाव सुचविल्याचं भुजबळ वेळोवेळी सांगता आहेत.. तर दुसरीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावाही सांगत आहेत. आता समता परिषद, ओबीसी संघटना, माळी समाजाच्या आग्रहाखातर भुजबळ नाशिकमधून माघारी घेण्याचा आपला निर्णय बदलणार का? भुजबळ नाशिकमधून लढणार का हेच पाहणं महत्त्वाचं ठरेल.
