Advertisement
मुंबई : भारतीय जनता पक्ष संघटन मजबूत करणारे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांनाही 75 वर्ष वयाचे कारण देऊन भारतीय जनता पक्षाने राजकारणातून बाजूला केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही याच नियमानुसार 75 वर्ष झाल्यानंतर राजकारणातून निवृत्त करून अमित शाह यांना पंतप्रधान करणार का? या प्रश्नाचे उत्तर भारतीय जनता पक्षाने द्यावे, अशी मागणी काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली आहे.
टिळक भवन इथं पत्रकार परिषदेला संबोधित करताना रमेश चेन्नीथला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणात हिंदू-मुस्लीम, पाकिस्तान हे मुद्दे घेऊन धार्मिक विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप केला. पश्चिम बंगालमध्ये मुस्लीम लोकसंख्या वाढली आहे असं नरेंद्र मोदी प्रचार सभेत म्हणाले. धार्मिक विभाजनाची भाषा करणे देशाच्या पंतप्रधानाला शोभत नाही. यातून जगात काय संदेश जातो, असा सवाल रमेश चेन्नीथला यांनी उपस्थित केला आहे. 10 वर्षात सरकारने काय काम केलं त्यावर नरेंद्र मोदी बोलत नाहीत. जनता मोदी सरकारच्या कारभाराला कंटाळली असून देशभर भाजपाविरोधी लाट आहे. लोकसभा निववडणुकीत भाजपाचा दारूण पराभव होत असून इंडिया आघाडीचे सरकार येणार असल्याचा विश्वास चेन्नीथला यांनी व्यक्त केला.
