Advertisement
शांतिगिरी महाराज, छगन भुजबळ दोघांचाही पत्ता कापला
नाशिक : नाशिकमधून महायुती कोणाला उमेदवारी देणार यासंदर्भात मागील काही आठवड्यांपासून सातत्याने उलट सुलट चर्चा सुरु होत्या. मात्र या प्रश्नाला उत्तर मिळालं असून शिंदे गटाने नाशिकमधील आपला उमेदवार जाहीर केला आहे. शिंदे गटाने हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे नाशिकमधून उमेदवारी अर्ज भरणारे शांतिगिरी महाराज असो किंवा येथून निवडणूक लढण्यास उत्सुक असलेले छगन भुजबळ असो दोघांचाही पत्ता कापला गेला असून हेमंत गो़डसेच नाशिकचे महायुतीचे उमेदवार असतील यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
नाशिकच्या जागेवर अजित पवार गटाच्या छगन भुजबळांना उभं करावं अशीही जोरदार चर्चा होती. भुजबळांनाही यासाठी रस असल्याचं स्पष्ट होतं. मात्र उमेदवारी जाहीर करण्यात होत असलेली दिरंगाई आणि चालढकलपणाला कंटाळून भुजबळांनी माघार घेत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर इथून अचानक काही दिवसांपूर्वी शांतिगिरी महाराजांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यांच्या अर्जावर शिवसेना शिंदे गट पक्षाचा उल्लेख होता. मात्र या अर्जाबरोबर पक्षाकडून दिला जाणारा एबी फॉर्म नव्हता. म्हणूनच येथील उमेदवारीसंदर्भातील संभ्रम कायम होता.
