Advertisement
अजित पवार यांनी दिले स्पष्टीकरण
इंदापूर : तालुक्यातील सभेत अजित पवार यांनी राजकीय भाष्य करत शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ले केले आहेत. शरद पवार यांनी कितीवेळा पक्ष बदलला ते तारखांसह सांगितले आहे. तसेच ज्या नेत्यांनी त्यांना मोठे केले, त्यांनाच कसा धोका दिला आहे, हे सांगितले. यावेळी अजित पवार यांनी गॉगल वापरण्याचे कारण सभेत सांगितले. ”माझ्या डोळ्याच्या रेटिनाचे ऑपरेशन झाले आहे. यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला गॉगल वापरावा लागत आहे. नाहीतर म्हणाल, हा शायनिंग मारायला लागला आहे,” असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले.
अजित पवार म्हणाले, आजच्या सभेच्या निमित्ताने येत असताना मला मागील आठवणी ताज्या झाल्या. मला पाहिली सभा आठवली. अनेक लोक त्यावेळी माझ्यासोबत होती. परंतु ती माणसे आता सोबत नाहीत, हा नियतीचा खेळ आहे. ही निवडणूक गावकी भावकीची नाही तर देशाचे भवितव्य ठरवणारी आहे. यामुळे तुम्हाला मोदी पंतप्रधान पाहिजेत की राहुल गांधी पंतप्रधान पाहिजेत हे ठरवा.
अजित पवार म्हणाले की, अनेकांना हा प्रश्न आहे की मी हा निर्णय का घेतला? आपण सगळ्यांनी माझे काम बघितलं आहे. तुम्ही सगळ्यांनी मला कारखान्याचे संचालक केले. माझा स्वभाव पाहिल्यावर मला कधी वाटले नव्हते की मी राजकारणात येईल. कारण मी एक घाव दोन तुकडे करत असतो.
