Advertisement
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत गेलो नसतो आणि काँग्रेसमध्ये असतो तर कदाचित मी मुख्यमंत्री झालो असतो, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे. भुजबळांच्या या दाव्यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भुजबळांच्या या दाव्यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर-तरला राजकारणामध्ये कोणते स्थान नसते. त्यामुळे ते काय बोलले याला काही महत्त्व नाही. काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. देशामध्ये आज अनेक प्रश्न आहेत. 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, आरोग्य व्यवस्था बरोबर नाही. देशामध्ये गरिबांच्या अन्नधान्यासाठी अनेक प्रश्न आहेत. रोजगाराचा प्रश्न आहे. हे प्रश्न काँग्रेसला महत्त्वपूर्ण आहेत. फालतूच्या राजकीय चर्चेपेक्षा काँग्रेस यांना महत्त्व देते, असा टोला नाना पटोले यांनी छगन भुजबळ यांना लगावला आहे.
छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
शिवसेना सोडून मी 1991 साली काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भाजप शिवसेनेच्या विरोधात काम केले म्हणून अनेक वेळा माझ्यावर जीवघेणे हल्ले झाले होते. 1995 मध्ये युती सरकार आले. मला विधान परिषदेतून आमदार करण्यात आले. विरोधी पक्षनेता म्हणून काम केले. त्यानंतर 1999 मध्ये काँग्रेसमधून शरद पवार बाहेर पडले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. मी शरद पवार यांच्यासोबत गेलो. त्यावेळी काँग्रेसने मला शरद पवार यांच्यासोबत जाऊ नये म्हणून सांगितले. तुम्हाला मुख्यमंत्रीपद देऊ, असेही सांगण्यात आले. परंतु मी पवार साहेबांची साथ दिली. त्यावेळी मी पवार साहेबांबरोबर गेलो नसतो तर मुख्यमंत्री झालो असतो, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.
