Advertisement
सोलापूर : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी येत्या 4 जून रोजी होणार आहे. उमेदवारांसह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची ही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान निवडणुकी नंतर प्रथमच काँग्रेसच्या आमदार तथा सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी माध्यमांसमोर बोलताना जनमत भाजपच्या बाजूने नाही म्हणून पंतप्रधानांनी निवडणुकीत ध्रुवीकरण केले पण लोक या गोष्टीला वैतागले आहेत, EVM बद्दल शंका असून शेवटचा पर्याय म्हणून सत्तेसाठी काहीही करू शकतात अशी प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेस पदाधिकारी भेटले जिल्हाधिकाऱ्यांना : काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी नगरसेवक विनोद भोसले, माजी सभागृह नेते बाबा मिस्त्री, माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे, मीडिया सेलचे तिरुपती परकीपंडला, नासीर बंगाली, सुभाष वाघमारे यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी तथा सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. मतदानासाठी वापरलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राशी मोबाईल टॉवर, किंवा वायफाय ईत्यादीच्या माध्यमातून छेडछाड ( हँकिंग ) करून मते परिवर्तित करण्याची भीती नागरिकांच्या मनात असून निवडणूक प्रक्रीयेत निष्पक्षता रहावी यासाठी निवडणूक आयोगाने सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून रामवाडी गोडावून सोलापूर येथील निवडणूकीत वापरलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्राँगरूम व मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवावा तसेच मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत परिसरातील मोबाईल टॉवर ही बंद ठेवावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
