Advertisement
लातूर : लातूरचा शिक्षणाचा पॅटर्न अनेक कारणाने डागाळला. लातूरमध्ये ‘नीट’ शिकवण्यांची हजार कोटींची बाजारपेठ आहे. पुस्तकांची आणि लेखन साहित्याच्या बाजारपेठेची उलाढाल 700 कोटी रुपये इतकी आहे. या इंडस्ट्रीला आता घरघर लागेलीय की काय? अशीच भीती वाटतेय. याचं कारण सध्याचा नीट चा घोटाळा आणि त्यावरून झालेले गंभीर आरोप. पैसे देऊन जर अशा पद्धतीने नीटची परीक्षा पास केल्या जात असतील आणि याचं कनेक्शन लातूरशी असेल तरा या क्लासेसच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. विद्यार्थ्यांमध्ये सुरू झालेली गुणवत्तेची स्पर्धा पाहता यांचाच फायदा घेऊन पडद्यामागे सुरू असलेल्या घटना समोर आल्या.
तात्कालिन दिवंगत मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मुलीला वैद्यकीय कॉलेजला प्रवेश मिळवण्यासाठी तिच्या गुणपत्रिकेतील मार्क्स वाढवण्यात आल्याचा आरोप त्या काळात करण्यात आला. येथे लातूर पॅटर्नला धक्का देणारी पहिली घटना घडली. हे प्रकरण राज्यभर गाजले. मुंबई उच्च न्यायालयातदेखील मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढण्यात आले. लातूरच्या पॅटर्नवर त्याकाळात शंका कुशंका घेण्यात आली. अशा स्पर्धेतून रक्तरंजित घटनाही घडल्या. क्लासेस चालकाच्या खूनाने लातूर हादरले. गुणवत्तेची स्पर्धा जिवावर उठण्यापर्यंत गेली आणि पुन्हा 30 वर्षांपासून गाजलेल्या पँटर्नला तडा गेला.
देश, राज्याला सर्वाधीक डॉक्टर देणार्या लातूर पँटर्नची स्पर्धा नीटच्या घोटाळ्याने बदनाम होईल असे कोणाला स्वप्नातही वाटले नसेल. मात्र या नीटच्या घोटाळ्याचे कनेक्शन समोर आल्याने गुणवत्तेसाठीच्या बोगसगिरीने लातूर पँटर्नवरच शंका निर्माण केली आहे.त्यामुळे क्लासेसच्या फँक्ट्रीसह लातूरच्या उद्योगभवनात उभ्या राहिलेल्या उद्योगांचे काय होणार? असा प्रश्न आहे.
