Advertisement
भाजपाचं सरकार येणार की काँग्रेस बाजी मारणार
दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी आज सातव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहेत. सातव्या टप्प्यात देशातील 7 राज्यं आणि एका केंद्राशासित प्रदेशातील 57 जागांवर मतदान होत आहे. मतदानाचा हा अखेरचा टप्पा असून यानंतर थेट निकालाची प्रतिक्षा असणार आहे. 4 जूनला मतमोजणी होणार असून, यानंतर देशात सलग तिसऱ्यांदा भाजपाचं सरकार येणार की काँग्रेस बाजी मारणार हे पाहावं लागणार आहे.
दुसरीकडे महाराष्ट्रातील 48 जागांवर नेमका काय निकाल असेल याचीही प्रचंड उत्सुकता आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील फुटीनंतर होणारी ही पहिली मोठी निवडणूक असल्याने महाराष्ट्राची जनता काय कौल देते हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. दरम्यान निकालाचा अंदाज वर्तवणारे एक्झिट पोल आज संध्याकाळी समोर येणार आहेत.
भाजपला 140 हून अधिक जागा मिळणं अशक्य : इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीला पोहोचलेल्या समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भाजपला 140 हून अधिक जागा मिळवता येणार नाही असं स्पष्ट केलं आहे. यावेळी जनताही भाजपविरोधात उभी राहिली असल्यामुळं त्यांना 400 पार सोडा, पण 140 पेक्षाही अधिक जागा मिळू शकणार नाहीत असं ते म्हणाले.
क्झिट पोलआधी इंडिया आघाडीची बैठक : एक्झिट पोल जाहीर होण्यापूर्वी काही तास आधीच इंडिया आघाडीची बैठक घेण्यात आली. मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी घेण्यात येणाऱ्या या बैठकीसाठी राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, सीताराम येचुरी आणि तेजस्वी यादव यांच्यासह इंडिया आघाडीतील अनेक आघाडीचे नेतेही हजर असल्याचं पाहायला मिळालं.
कोणत्या टप्प्यात किती मतदान झालं होतं? : टप्प्यांनुसार मतदानाची आकडेवारी पाहायची झाल्यास देशात पहिल्या टप्प्यात एकूण 66.14 टक्के, दुसऱ्या टप्प्यात 66.71 टक्के, तिसऱ्या टप्प्यात 65.68 टक्के, चौथ्या टप्प्यात 69.16 टक्के, पाचव्या टप्प्यात 62.2 आणि सहाव्या टप्प्यात 63.36 टक्के इतकं मतदान झालं.
प्रशांत किशोर आणि योगेंद्र यादव यांची भविष्यवाणी : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएचा मोठा विजय होईल अशी भविष्यवाणी केली आहे. पण त्यांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील युती 400 चा आकडा पार करु शकणार नाही असं म्हटलं आहे. तर योगेंद्र यादव यांनी भाजपाला 240 ते 260 जागा मिळतील असं म्हटलं आहे. तर एनडीएला 35 ते 45 जागा मिळतील असं म्हटलं आहे.
