Advertisement
स्थानिक प्रबळ दावेदार असताना बाहेरचा उमेदवार दिल्याने भाजपचा पराभव
सोलापूर : लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी दणदणीत विजय मिळवला. भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असलेला गड पुन्हा काँग्रेसने सहज ताब्यात घेतला, याकरिता भाजपचे वरिष्ठ नेतेच जबाबदार असल्याचे सरळ सरळ उघड झाले आहे. उमेदवार निवडीपासूनच भाजपची राजकीय गणितं चुकत गेली. स्थानिक उमेदवार देण्याऐवजी बाहेरचा उमेदवार सोलपूरकरांवर लादणे ही भाजपची मोठी चूक ठरली याशिवाय विविध समाजाकडून मतांची गोळाबेरीज करण्यात भाजपचे नेते कमी पडले. विशेष म्हणजे एकेकाळी शरद पवार यांचे उजवा हात मानले जाणारे अनुभवी प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनीही उमेदवारी मागितली होती, परंतु, ढोबळे केवळ आश्वासनांवर झुलविण्यात भाजपने धन्यता मानली त्याचा मोठा फटका बसणार हे त्याच वेळी ढोबळे समर्थक सांगत होते परंतु, याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर भाजपला येथे पराभवाचा सामना करावा लागला. ज्या दिवशी ढोबळेंना तिकीट नाकारले त्याच दिवशी सोलापूरकरांनी वनसाईड प्रणीती शिंदेना निवडून आणल्याचे निश्चित झाले होते.
भारतीय जनता पक्षाने सोलापुरात स्थानिक उमेदवार असतानाही उमेदवारी देण्यातच उशीर केला. स्थानिक प्रबळ दावेदार असतानाही भाजपने आपल्या धोरणानुसार नवा चेहरा देण्याचा प्रयत्न केला तो चांगलाच अंगलट आला. त्यातच बाहेरचा उमेदवार दिल्याने अनेकांच्या नाराजीचा फटका भाजपला ऐनवेळी निवडणुकीत बसला. बाहेरचा उमेदवार सोलापूरचा खासदार होण्यापेक्षा प्रणिती शिंदे काय वाईट आहेत? अशी मानसिकता तयार झाली. भाजपने बाहेरच्या अनोळखी उमेदवारास संधी देऊन स्वत:च्याच पायावर धोंडा मारून घेतला. भाजपच्या अशा कारभारामुळे काँग्रेसचा विजय निश्चीतच सोपा झाला.
सोलापूर लोकसभा मतदार संघात 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. सिद्धेश्वर स्वामी निवडून आल्यानंतर हा मतदार संघ ‘भाजप’मय झाला असल्याचे छातीठोकपणे सांगितले जात होते. परंतु, त्यापूर्वीचे माजी खासदार शरद बनसोडे असो की त्यानंतरचे स्वामी यांनी सोलापूरच्या विकासासाठी कुठलेही ठोस काम केली नसल्याची भावना सोलापुकरांच्या मनात होती. त्यामुळे सोलापुरातील तळागळातील प्रश्न जाणणारा आणि जनमाणसात उठबस असणारा, सामान्यातील सामान्य माणसाची समस्या जाणून असणारा उमेदवार भाजपकडून दिला जाईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी निवडणुकीत संपूर्ण स्थानिक प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतल होती. त्यामुळे भाजपच्या मतांमध्ये वाढ झाली होती, अशावेळी आगामी म्हणजेच 2024 मध्ये लक्ष्मणराव ढोबळे हे भाजपचे लोकसभेचे उमेदवार असतील, अशी चर्चा मागील वर्षभरापासूनच सुरू झाली होती. परंतु, नवा प्रयोग करण्याच्या पोकळ प्रयत्नात भाजपने आपल्या हक्काची लोकसभेची सोलापुरातील जागा घालविली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अनेकांनी कान फुंकले. यामुळे भाजपकडून लोकसभेचा उमेदवार देताना अनेक नावे समोर आली आणि तशीच ती बाजुलाही पडली. परंतु, लक्ष्णराव ढोबळे हे नाव दुर्लक्षित करण्यासारखे नव्हते, त्यांच्या उमेदवारीबाबत अनेक संस्था, संघटनांनी भाजपकडे निवेदनेही दिली होती. मात्र, चुकीच्या माहितीच्या आधारे बाहेरचाच उमेदवार सोलापुरकरांवर लादला गेला, त्याचा परिणाम म्हणूनच ही जागा भाजपला गमवावी लागली आहे.
केवळ कमळ चिन्हांवर भाजपचा उमेदवार निवडून येईल, अशी सध्याची भाजपची सोलापुरातील स्थिती नव्हती. सोलापुरातील जागरूक जनता केवळ मोदी आणि कमळ पाहून मतदान करणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले होते. आजपर्यंत भाजपचे दोन खासदार निवडून दिले त्यांनी काय केले, याचा लेखाजोखा आता मतदार मांडत होते. त्यामुळे बाहेरचा उमेदवार येथे येऊन खासदार होऊच शकत नव्हता. केवळ स्थानिक उमेदवार म्हणूनच प्रणिती शिंदे या विजयी झाल्या आहेत. बाहेरचा आयात केेलेला उमेदवार देणे भाजपला चांगलेच महागात पडले.
