Advertisement
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या राज्य निवडणूक आयोगाला सूचना
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. राज्यात मतदानाच्या शेवटच्या टप्प्याच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगासह भाजपला टार्गेट केल्याची तक्रार भाजप नेते आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले होते. उद्धव ठाकरेंची संपूर्ण पत्रकार परिषद निवडणूक आयोगाकडून तपासून पाहण्यात आली. यात काही वादग्रस्त असेल तर उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्यात येणार असल्याचं संकेत देण्यात आले होते.
मुंबईत मतदानात झालेल्या दिरंगाईमुळे उद्धव ठाकरे संतापले होते. निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी सेना भवनमध्ये संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन केला. मुंबईत ठिकठिकाणी संथ गतीनं मतदान होत असल्याचा आक्षेप उद्धव ठाकरेंनी घेतला होता. निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप ठाकरेंनी केला. तर मुंब्र्यात एका तासात केवळ 11 जणांचं मतदान झालं, त्यासाठी संजय राऊतांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर खापर फोडलं.
याप्रकरणी उद्धव ठाकरेंविरोधात भाजप नेते आशिष शेलारयांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन खोटी आणि दिशाभूल करणारी विधानं केल्याचं तक्रारीत म्हटल होते. त्याचबरोबर सत्ताधारी भाजपवर चुकीचे आरोप केले आणि निवडणूक आयोगावरही आरोप केलेत. हे आचारसंहिता उल्लंघन असून यावर कारवाई करण्याची मागणी आशिष शेलार यांनी पत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे केली होती.
