Advertisement
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला दावा
मुंबई : अजित पवार आणि शिंदे गटातील आमदारांपैकी 40 आमदारांची घरवापसी महिन्याभरात होईल अशी भविष्यवाणी काँग्रेसच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता विधानसभेच्या तयारीकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलेलं असतानाच दोन्ही बाजूने वेगवगळे दावे केला जात आहेत. यामध्ये आता काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या दाव्याची भर पडली आहे. वडेट्टीवार यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याबरोबर मूळ पक्ष सोडून बाहेर पडलेल्या आमदारांपैकी बरेच जण स्वगृही म्हणजेच मूळ पक्षात परततील असा दावा केला आहे. पुढील महिन्याभरामध्ये राज्यात हा मोठा राजकीय भूकंप होईल असं भाकित वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं आहे. अजित पवार गटाचे असो किंवा शिंदे गटाचे असो. पुढच्या महिन्याभरामध्ये या दोघांचे मिळून 40 आमदारांची घरवापसी होईल, अशी परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झाली आहे. तशापद्धतीने हे लोक संपर्क साधत असल्याची माहिती समोर आली आहे. हे होण्यात कोणतीही अडचण दिसत नाही. महाराष्ट्रातील वारे आता महाविकास आघाडीच्या दिशेने वाहत आहे, अस मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं आहे.
