Advertisement
घोडेबाजार तेजीत? निवडणूक अटळ
मुंबई : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे निवडणूक होणार हे अटळ आहे, त्यासोबतच या निवडणुकीत घोडेबाजार होण्याचीही शक्यता वर्तवली जाते आहे. महाविकास आघाडीनं संख्याबळापेक्षा एक उमेदवार जास्त उभा केला आहे. विधान परिषदेच्या या मैदानात राज्यातील अनेक दिग्गज नेते उतरल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार होणार असल्याची शक्यता आहे.
भाजपचे उमेदवार : पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि योगेश टिळेकर हे आहेत.
शिवसेना शिंदे गट : कृपाल तुमाने, भावना गवळी हे आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट : शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर
काँग्रेस : प्रज्ञा सातव, शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर शेकापचे जयंत पाटील हे महाविकासआघाडीचे उमेदवार आहेत.
संख्याबळाचा विचार केला तर महाविकास आघाडीचे 69 आमदार आहेत. त्यांचे दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. मात्र, मविआनं तीन उमेदवार दिल्यानं निवडणुकीत रंगत आली आहे. यामधलं एक महत्वाचं नाव म्हणजे मिलिंद नार्वेकर. नार्वेकर हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक आहेत.
अगदी शिंदेंच्या शिवसेनेतीलही काही मतं नार्वेकरांना मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. मागील काही दिवसांपासून मिलिंद नार्वेकर हे भाजपच्या काही नेत्यांशी गुप्तगु करताना पाहायला मिळालं. आशिष शेलार, प्रवीण दरेकर, राम कदम यांच्याशी मिलिंद नार्वेकरांची झालेली चर्चा हा चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे भाजपचे आमदारही नार्वेकरांना मदत करणार का अशी चर्चा आहे.
