Advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात विधानपरिषद निवडणुकीत घोडेबाजार
मुंबई : विधानपरिषदेची निवडणूक 12 जुलैला होणार आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्यानं ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे. आगामी विधानपरिषद निवडणुकीत दगाफटका टाळण्याचा खटाटोप सर्वच पक्षांनी सुरू केला आहे. महाराष्ट्रातील आमदारांचा मुक्काम सध्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आहे. महाविकास आघाडीनं संख्याबळापेक्षा एक उमेदवार जास्त उभा केला आहे. विधान परिषदेच्याया मैदानात राज्यातील अनेक दिग्गज नेते उतरल्याचं पाहायला मिळत आहे.
फोडाफोडी होवू नये म्हणून सर्वच पक्षांनी खबरदारी घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुढचे 3 दिवस भाजप आमदारांचा मुक्काम हॉटेल ताज प्रेसिडेंटमध्ये असणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार वांद्रे इथल्या हॉटेल ताज लँड्स एन्डमध्ये मुक्कामाला असतील. शिंदेंच्या आमदारांसाठी ताज हॉटेलमध्ये 60 रूम बुक करण्यात आल्या आहेत. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे उपस्थित राहणार असून आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अंधेरीच्या हॉटेलात राहणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांची सोय परळच्या आयटीसी सेंट्रल ग्रँड मराठा हॉटेलमध्ये करण्यात आली आहे.
