Advertisement
मुंबई : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट जोरदार तयारीला लागला आहे. परंतु, अजित पवार गटाच्या आमदाराने राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी नुकतीच आपली राजकीय निवृत्ती जाहीर केली आहे.आगामी विधानसभा निवडणूक आपण लढवणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. असे असले तरी आपला राजकीय वारसदार कोण असणार, याची माहितीदेखील त्यांनी दिली आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर असताना प्रकाश सोळंके यांनी ही घोषणा केली आहे. पुतण्या जयसिंह सोळंके हा आपला राजकीय वारसदार असल्याचे प्रकाश सोळंके यांनी यावेळी सांगितले.
जयसिंह सोळंके हे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या लहान बंधूंचे पुत्र आहेत. धैर्यशील सोळंके असे त्यांच्या लहान भावाचे नाव आहे. जयसिंह सोळंके हेदेखील राजकारणात अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. धारूर पंचायत समितीचे उपसभापती राहिलेले आहेत. बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.
