Advertisement
भाजप विरुद्ध अजित पवार वाद
पुणे : विधानसभा निवडणुकीपूर्वीच महायुतीतील धुसफूस दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ही धुसफूसमुळे घटक पक्षांच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. पुण्यात महायुतीत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील आजी-माजी आमदारांमध्ये श्रेय वाद उफाळून आला आहे. महायुतीत वडगावशेरीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर महायुतीत घटक पक्षामध्ये वाद वाढल्याची चर्चा आहे.
वडगावशेरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्या मतदार संघातील 300 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन अजित पवारांच्या हस्ते होणार आहे. त्याची जोरदार जाहिरातही टिंगरे यांनी सोशल मीडियावर केली आहे. मात्र जाहिरातीवर आता माजी आमदार जगदीश मुळीक यांनी आक्षेप घेतला आहे. मतदार संघातील विकास कामांचा पाठपुरावा एकट्या आमदारांनी केलेला नाही. जाहिरातीवर शिंदे आणि फडणवीस यांचे फोटो नसल्यानं मुळीक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसंच मुळीक विधानसभेसाठी वडगावशेरीतून इच्छुक असल्याची माहिती आहे. त्यामुळे या जागेवरून महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
वडगावशेरी मतदारसंघातील येरवडा मध्यवर्ती इमारत, येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय इमारत आणि जमावबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख इमारत या अशा तब्बल 306 कोटी 41 लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. अजित पवार हे महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत अहिल्याभवन इमारतीच्या सुरु असलेल्या कामाची पाहणी देखील करणार आहेत.
