Advertisement
आमदार बच्चू कडू यांच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष
मुंबई : राज्यात महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडून तिसरी आघाडी स्थापन करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शुक्रवार (9 ऑगस्ट 2024) बच्चू कडूंचा संभाजीनगरात मोर्चा आहे. याचवेळी बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.त्यामुळे आमदार बच्चू कडू यांच्या निर्णयाकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
विधानसभेसाठीची मोर्चेबांधणी सुरू झालेली असतानाच महायुतीने निवडणुकीसाठीच्या प्रचाराचं रणशिंग फुंगल्याचं पाहायला मिळत आहे. गुरुवारी रात्री तब्बल दोन तास वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये सदरील मुद्द्यावर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी पार पडलेल्या या बैठकीत 20 ऑगस्टपासून राज्यात महायुतीचे मेळावे सुरु होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.
थोडक्यात महायुतीने विधानसभेच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं असून महायुतीचे नेते एकत्र प्रचार करणार आहेत हे आता स्पष्ट होत आहे. सात विभागांत महायुतीच्या मोठ्या सभा होणार आहेत. ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री सभांना संबोधित करतील.
