Advertisement
मुख्यमंत्री शिंदे यांना ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांचे निवेदन
पुणे : राज्य शासनाकडून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेल्या लाडकी बहिण योजनसाठी अर्ज करण्याची मुदत शनिवारी ३१ आॅगस्टला संपणार आहे. परंतु, ग्रामीण भागातील खऱ्याअर्थी गरजू असलेल्या महिलांना या योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे जमविण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे या योजनेला आणखी एक-दोन महिन्यांची मुदतवाढ द्यावी. अशी मागणी बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात या हेतुने राज्य शासनाने लाडकी बहिण योजन सुरू केली आहे. परंतु, यासंदर्भातील कागदपत्र जमविण्यात ग्रामीण भागातील महिलांना अडचणी येत आहेत, या योजनेसाठी आधारकार्ड, रेशनकार्ड तसेच रहिवासी पुरावे आवश्यक आहेत. अनेक महिलांच्या आधारकार्डमध्ये पत्ता, वय, नावाच्या त्रुटी असून त्या दूर करण्यासाठी त्यांच्याकडून आधारकार्ड अपडेट केली जात आहेत. परंतु, ग्रामीण भागात नेटवर्क नसणे, संबंधीत अधिकारी जागेवर नसणे, अशा अनेक अडचणींमुळे कागदपत्र उपलब्ध झालेली नाहीत त्यामुळे या योजनेसाठी अर्ज भरण्यात ग्रामीण भागातील महिलांना मोठ्या अडचणी येत आहेत. कागदपत्रं जमविण्याातच शहरी तसेच ग्रामीण भागातील महिलांची मोठी दमछाक होत आहे. परिणामी, कागदपत्र उशीरा मिळत असल्याने अनेक महिलांनी अर्ज भरलेले नाहीत. अनेक महिला पात्र असूनही त्या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने या योजनेला किमान एक-दोन महिने मुदतवाढ मिळावी, अशी मागणी ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
