#

Advertisement

Friday, August 30, 2024, August 30, 2024 WIB
Last Updated 2024-08-30T11:10:06Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

अजितदादांच्या मनात काय ? तिसऱ्या आघाडीत जाणार?

Advertisement


मुंबई : शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर महायुतीतल्या नेत्यांनी नौदलावर खापर फोडून वादाला आमंत्रण देणारी वक्तव्य करत असताना अशावेळी मात्र, अजितदादांनी महाराष्ट्राची माफी मागत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. अजितदादांनी माफी मागितल्यानंतर  सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी पक्षानं मुंबई, पुणे,ठाणे आणि नाशिक शहरात आंदोलन केलं आणि पुतळा प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. शिवरायांचा पुतळा अपघात प्रकरणानंतर अजित पवारांच्या पक्षांकडून आंदोलन का केलं जातंय? सत्ताधारीच आंदोलन का करत आहेत ? दादांच्या मनात काय आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.
शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महायुतीतल्या नेत्यांनी गांभीर्य दाखवत जबाबदारपणे वक्तव्य करणं अपेक्षित होतं. मात्र, मुख्यमंत्र्यांसह महायुतीतल्या अनेक नेत्यांनी वादाला आमंत्रण देणारी वक्तव्य केली. याऊलट अजित पवारांनी जनभावना समजावून घेत जनतेची माफी मागितली आणि महायुतीतलं आपली स्वत:ची वेगळी भूमिका असल्याचं सिद्ध केलं.  शिवरायांचा पुतळा अपघात प्रकरणच नव्हे तर अजित पवारांनी अनेकदा यापूर्वी महायुतीतल्या नेत्यांपेक्षा वेगळी भूमिका मांडत महायुतीत आपलं स्वतंत्र अस्तित्व दाखवल्याचं दिसून येत आहे. 
अजित पवारांचा पक्ष वेगळी वाट धरणार?
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी फोडून महायुतीशी घरोबा केला. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना केवळ एकच जागेवर समाधान मानावं लागलं. तसेच भाजपलाही कमी जागा मिळाल्या. अजित पवाराना महायुतीत घेतल्यानंतर  संघाच्या मुखपत्रातून अजित पवारांवर टीका करण्यात आली. या टीकेनंतर अजित पवार गटात नाराजी दिसून आली. महायुतीमधून अजित पवार यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशाही चर्चा सुरू आहेत. विधानसभा निवडणूक महायुती एकत्र लढणार की नाही याबाबत साशंकता असल्याचं मोठं विधान आमदार अमोल मिटकरींनी केलं होतं. अजित पवार तिसऱ्या आघाडीत जाणार का ? याचीही सध्या चर्चा सुरू आहे. संघाची टीका असो की शिवरायांच्या अपघात प्रकरणावरून माफी असो आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांचा पक्ष वेगळी वाट धरणार का ? याची चर्चा सुरू आहे.