Advertisement
मुंबई : उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला सुरुवात झाली आहे. मात्र, अजित पवारांच्या या यात्रेदरम्यान सुरक्षेचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्य गृह विभागाच्या सूचनेनंतर यात्रेदरम्यान पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
अजित पवार आज जनसन्मान यात्रेसाठी जळगाव, धुळे आणि मालेगाव येथे दौऱ्यावर आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या गुप्तवार्ता विभागामार्फत अजित पवारांची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनेनंतर आता पोलीस अलर्ट मोडवर आहेत. तसंच, पवारांच्या सुरक्षेत मोठी वाढ देखील करण्यात आली आहे.
अजित पवारांना काळजी घेण्याच्या सूचना आल्यानंतर त्यांनी यावर प्रतिक्रियादेखील दिली आहे. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत दौरा आम्ही करणारच ना. पोलिसांचे काम आहे सुरक्षा देणे तिथे काही चुकीचं घडू नये याकडे लक्ष देणे, ते याची काळजी घेतील, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. जनसन्मान यात्रेवेळी पवार वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देणार आहेत. तसंच, मेळावादेखील घेणार आहेत. अजित पवारांच्या मेळाव्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष खरबदारी घेण्यात येणार आहे.
