Advertisement
पुणे : भाजपचे दोन बडे नेते शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. पश्चिम महाराष्ट्रातील दोन बडे नेते शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. कोल्हापूरचे भाजपचे नेते समरजित घाटगे हे शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत. समरजीत घाटगे यांचा शरद पवार गटात प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. तर पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे भाजप नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत.
अजित पवार कोल्हापुरात असताना त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांची कागलमधून उमेदवारी जाहीर केली. समरजित घाटगे इथून लढण्यास इच्छुक होते. मात्र महायुतीत ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पर्याय निवडल्याचं समजते. तर इंदापूरमध्येही विधानसभेला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे शरद पवात प्रवेश करून निवडणूक लढवतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
वेट आणि वॉचची भूमिका
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना शरद पवार गटाकडून संपर्क केला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यासाठी शरद पवार गटाकडून चाचपणी सुरु असल्याची माहिती आहे. हर्षवर्धन पाटील यांची मात्र वेट आणि वॉचची भूमिका असल्याचं कळतं आहे. महायुतीत इंदापूरची जागा अजित पवार गटाला जाण्याची शक्यता आहे. महायुतीकडून हर्षवर्धन पाटील यांना अद्याप शब्द देण्यात आला नाही. गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटलांचे गावभेट दौरे सुरु आहेत.
