Advertisement
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता
पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. या योजनेचा अर्ज भरण्यासाठी 31 ऑगस्ट होती शेवटची मुदत होती. अधिकाधिक महिलांना लाभ घेता यावा यासाठी सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. लवकरच महाराष्ट्र सरकार यासंदर्भात निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. या योजनेला आणखी एक-दोन महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यांच्या या मागणीची दखल मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली आहे. या संदर्भांत त्यांना प्रतिक्रियाही कळविण्यात आले आहे. याबाबत ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी समाधान व्यक्त केले आहे. राज्यभरातील काही संघटना, सामाजिक संस्थांनीही अशी मागणी लावून धरली होती.
दरम्यान, 2.5 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील 21 ते 35 वयोगटातील महिला आणि मुलीसाठी ही योजना आणण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत त्यांना 1500 रुपये मासिक मदत मिळणार आहे. 14 ऑगस्टपासून या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.
यासंदर्भातील कागदपत्र जमविण्यात ग्रामीण भागातील महिलांना अडचणी येत असल्याने या योजनेसाठी आधारकार्ड, रेशनकार्ड तसेच रहिवासी पुरावे आदी कागदपत्रे मिळवण्यात अडचणी येत होत्या. नेटवर्क नसणे, संबंधीत अधिकारी जागेवर नसणे, अशा अनेक अडचणींमुळे कागदपत्र उपलब्ध झाली नाही त्यामुळे कागदपत्र उशीरा मिळत असल्याने अनेक महिलांनी अर्ज भरले नाहीत. अनेक महिला पात्र असूनही त्या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने या योजनेला किमान एक-दोन महिने मुदतवाढ मिळावी, अशी मागणी ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
