#

Advertisement

Wednesday, September 11, 2024, September 11, 2024 WIB
Last Updated 2024-09-11T11:32:15Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

दादा, तुमचं वागणं बदललंय, तुमच्यासाठी पवारसाहेबांना धोका दिला, आम्ही काय मिळवलं?

Advertisement


अजित पवारांच्या कार्यकर्त्याचे पत्र व्हायरल  
बारामती : लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी बारामतीकरांनी अजित पवारांच्या नावाने लिहिलेलं एक पत्र व्हायरल झालं होतं, आता विधानसभेच्या आधीही तशाच प्रकारचं एक पत्र बारामतीमध्ये पुन्हा व्हायरल होत आहे. अजित पवारांच्या एका कट्ट्रर कार्यकर्त्याने हे पत्र लिहिलं असून त्यामध्ये त्याने आपले नाव जाहीर केलं नाही. एकेकाळी कणखर, स्पष्टवक्ता अशी ओळख असलेल्या अजितदादांचा सूर का बदलला, त्यांच्यावर काही दबाव आहे का असा सवाल या कार्यकर्त्यांने विचारला आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर अजितदादा आमच्याकडे संशयाने पाहतात, मग पवार साहेबांना धोका देऊन आम्ही नेमकं काय मिळवलं असा सवालही या  पत्रातून विचारला आहे.
अजित पवारांच्या नावाने हे पत्र लिहिलं असून ते बारामतीमधील एका कार्यकर्त्याने लिहिलं असल्याचं सांगितलं जातंय. हे पत्र निनावी लिहिलं असून नाव लिहिलं तर आमचं राजकारण संपेल अशी भीतीही त्यामधून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटलंय की, "दादा, आजकाल तुमचं वागणं, बोलणं आणि ऐकणंसुद्धा बदललं आहे. तुम्ही खदखद व्यक्त करताय, मन मोकळं करताय की भावनिक कार्ड खेळताय हेच समजत नाही. तुमच्या भाषणातला रांगडेपणा, स्पष्टपणा, रोखठोक आणि लढावू बाणा हरवला आहे की काय?
सुनेत्रा वहिनींच्या पराभवाला तुम्ही सोडून बाकी सर्वजण जबाबदार आहेत अशी तुमची भावना झालीय. तुम्ही घाबरून का गेलाय? तुम्ही कोणत्यातरी दबावाखाली असल्याचं वातावरण निर्माण झालंय. आमचे कणखर दादा इतके हतबल का झालेत.  भावनिक होऊ नका म्हणून सांगत होता, आता स्वतःच भावुक होताय असंही त्या पत्रात म्हटलंय. तुम्ही आता आमच्याकडे संशयाने पाहताय, पण मग ज्या पवार साहेबांमुळे आम्हाला ओळख आणि पदे मिळाली, मान-सन्मान मिळाले. त्यांना तुमच्यासाठी धोका देऊन आम्ही नेमकं काय मिळवलं? असा प्रश्न अजितदादांच्या कार्यकर्त्याने केला आहे. निराशेची जळमटे फेकून द्या. जिद्दीने उभे राहू आणि पुन्हा एकदा बारामतीचा गढ काबिज करू असंही त्या पत्रामध्ये म्हटल आहे.