Advertisement
मुंबई : मुंबईसह संपूर्ण राज्यात भाजपच्या विरोधात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका करण्यात आली आहे. भाजपच्या विरोधातील या पोस्टर मध्ये देवेंद्र फडणवीस यांचं व्यंगचित्र दाखवण्यात आलं आहे. तसंच ‘तुम्ही उपाशी भाजप तुपाशी’ अशी टॅगलाईन देखील या पोस्टर्सवर लिहीण्यात आली आहे. मुंबईपासून संपूर्ण राज्यभरात ही पोस्टर्स लावण्यात आली आहे. काँग्रेसच्या वतीने या पोस्टर्सद्वारे महागाईविरोधात सरकारला घेरण्यात आलं आहे. यामुळे आता भाजप वि. काँग्रेस अशी चांगलीच जुंपण्याची शक्यता दिसत आहे.
आगामी विधासभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती सरकार जोमाने कामाला लागलं आहे. तर राज्यातील गुन्हे, अपघात, छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळणे, बदलापूरमधील मुलींवर झालेला अत्याचार, नागपूर हिट अँड रन अशा अनेक गुन्ह्यांवरून विरोधक रान उठवत आहेत. या मुद्यावरून ते सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. हे कमी की काय म्हणून आता काँग्रेसतर्फे मुंबईसह संपूर्ण राज्यात भाजप आणि देवेंद्र फडणवीसांविरोधात पोस्टर्स लावण्यात आली आहेत. महागाईच्या मुद्द्यावर भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करणारी व्यंगचित्रे विविध शहरांमध्ये लागली आहेत.
