Advertisement
मुंबई : लोकसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामध्ये इनकमिंग वाढले आहे. अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे आणि भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी शरद पवारांची भेट घेतली. माढा विधानसभेचे आमदार बबनदादा शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्याच्या आदल्या दिवशीच मधील राजन पाटील यांनीदेखील पवारांची भेट घेतल्याने सोलापुरातील राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसत आहे.
शरद पवारांनी त्यांना सोडून गेलेल्या काही नेत्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून कोणत्याही परिस्थितीत त्यांचा पराभव करायचाच अशा चंग बांधल्याचं दिसतंय. त्यात लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दहापैकी आठ जागांवर घवघवीत यश मिळालं. तर अजित पवारांना फक्त एकच खासदार निवडून आणता आला. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटातील अनेक नेते हाती तुतारी घेण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय आहे.
