Advertisement
उमरगा येथे बहुजन रयत परिषदेचा पुरस्कार वितरण सोहळा
उमरगा : महिलांनी सक्षम होणे ही काळाची गरज आहे आणि खऱ्या अर्थाने आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सक्षम होण्यासाठी बचतगट हा एक महत्त्वपूर्ण मार्ग आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी उमरगा येथे आयोजित कार्यक्रमात केले. बहुजन रयत परिषदेच्या वतीने पुरस्कार वितरण समारंभ व बचत गटाविषयीचे मार्गदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्तींना बहुजन रयत परिषदेच्या वतीने देऊन सन्मानित करण्यात आले. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले की, आज व्यसनाधीनता प्रचंड प्रमाणामध्ये वाढत आहे. व्यसनाधीनतेला लगाम घालण्यासाठी महिलांनी पुढे येणे गरजेचे आहे. यातूनच घराची अर्थव्यवस्था व्यवस्थितपणे सुरू राहील. अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बचतगटाच्या माध्यमातून हजारांपेक्षा जास्त महिलांना एकत्र केल्याचे त्यांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. धाराशिव जिल्ह्यातील भगिनींनी देखील अॅड. कोमलताई साळुंखे - ढोबळे यांच्याकडे अर्ज भरून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, यावेळी ढोबळे यांनी पुरस्कार प्राप्त झालेल्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमासाठी उमरगा तालुक्याचे ज्ञानराज चौगुले उपस्थित होते. मनोगत व्यक्त करताना चौगुले म्हणाले की, अॅड. ढोबळे यांचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. ज्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे त्या-त्या व्यक्तींचे अभिनंदन.
बहुजन रयत परिषदेच्या अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, धाराशिव जिल्ह्याशी जिव्हाळ्याचे नाते आहे. या जिल्ह्याशी माझा खूप दिवसांपासूनचा ऋणानुबंध आहे. धाराशिव जिल्ह्याला खूप मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील गरजू महिला भगिनींनी एकत्रित येऊन बचतगटाच्या माध्यमातून आपली आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक उन्नती साध्य करणे महत्त्वाचे आहे. यासाठी मी आपल्या समवेत सदैव आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक बहुजन रयत परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष बालाजी गायकवाड आणि प्रदेश सरचिटणीस ईश्वर क्षीरसागर यांनी केले. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यक्ती, उद्योजक व मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.