Advertisement
खासदार सुप्रिया सुळे यांनी केले स्वागत
मुंबई : सोलापुरातील ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव ढोबळे यांच्या घराशी आमचे गेली चार दशके जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आज ते पुन्हा शरद पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढण्यास आमच्या सोबत येत आहेत, याचा मोठा आनंद होत असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव ढोबळे यांनी भाजपला रामराम करीत आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी ढोबळे यांचे पक्षात स्वागत केले. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार सुळे यांनी शरद पवार आणि लक्ष्मणराव ढोबळे यांच्या मैत्रीपूर्ण संबंधाविषयी सांगितले तसेच ढोबळे यांच्या सारख्या अनुभवी नेत्याच्या मार्गदर्शनाखाली पक्ष मोठे यश मिळवेल, असा विश्वासही व्यक्त केला.
पक्षाचे नेते शरद पवार यांच्या बरोबर अनेक वर्षे काम केले आहे, यापुढील काळात पक्षवाढीसाठी तुतारीसाठी केवळ सोलापुरातच नव्हे तर राज्यभरात कार्यरत राहणार असल्याचे लक्ष्मणराव ढोबळे यांनी सांगितले. यावेळी ढोबळे यांच्या निर्णयाचे स्वागत करीत त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी तुतारी चिन्ह असलेले पंचे गळ्यात घालून शरद पवार आणि ढोबळे यांच्या जयजयकारच्या घोषणा दिल्या. दरम्यान, ढोबळे यांच्यावर सोलापुरातील चार तालुक्यांची जबाबदारी शरद पवार यांनी दिली आहे, आगामी काळात राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर लक्ष्मणराव ढोबळे आपल्या भाषण कौशल्याने सभा जिंकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
