Advertisement
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लक्ष्मणराव ढोबळे यांचा प्रवेश
सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते लक्ष्मणराव ढोबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला आहे. सोलापुरच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा खूप मोठा टर्निंग पॉइंट मानला जात आहे. शरद पवार यांचे जुने आणि जवळचे सहकारी असलेले ढोबळे यांनी दहा वर्षानंतर घरवापसी केली, या कालावधीत त्यांनी विरोधकांवर टीका करीत असताना शरद पवार यांच्या विरोधात एकही शब्द कधी काढला नाही, ही एक जमेची बाजू पाहता ते पुन्हा शरद पवार यांच्या सोबतीला जाणार याचा अंदाज बांधला जात होताच. परंतु, याची खरी सुरूवात लोकसभा निवडणुकीपासून झाली. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या बहुजन रयत परिषदेच्या अध्यक्षा अॅड. कोमलताई ढोबळे यांनी शरद पवार यांच्याबरोबरचे छायाचित्र आपल्या मोबाइल स्टेटस्वर ठेवले होते. त्यावेळी लावा तर्क.., असेही संबोधले होत त्याचा खरा अर्थ आज ढोबळे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे सर्वांच्याच लक्षात आला.
सोलापूर लोकसभा मतदार संघात प्रचार शिगेला पोहचलेला असताना सोलापुरात मातंग समाजाचे नेते तथा भाजपचे प्रवक्ते लक्ष्मणराव ढोबळे यांचा विसर अन्य पक्षासह भाजपच्या वरिष्ठ नेतेमंडळींना पडला होता. त्यावेळी लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या अॅॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी बहुजन रयत परीषदेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची विशेष बैठक घेत आपल्याला कोणत्याही पक्षाला थेट पाठींबा द्यायचा नाही. मात्र, जनतेच्या समस्या सोडविणार्या आणि जनतेच्या मनातील उमेदवाराच निवडून यायला हवा, अशा उमेदवारालाच मतदान करण्याचे निर्देश केले होते. अॅड. कोमलताई यांनी केलेले हे आवाहन लोकसभा निवडणुकीतील राजकारणाला मोठी कलाटणी देणारे ठरले. कारण, बहुजन रयत परीषदेने संपूर्ण महाराष्ट्रात ज्या-ज्या उमेदवाराला मतदान केले ते उमेदवार निवडून आले. परंतु, सोलापुरात मात्र भारतीय जनता पक्षाच्या हेच जमले नसल्याची चर्चा सर्वत्र झाली. त्यातच भाजप पक्षातील नेतेमंडळींकडून ढोबळे यांना सातत्याने डावलेले जात असल्याचे लक्षात घेत अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी शरद पवार यांचे जुने फोटोंचे स्टोटस् मोबाइलवर ठेवत खळबळ उडवून दिली होती. त्याच वेळी ढोबळे हे शरद पवार यांच्या पक्षात जाणार असल्याची जोरदार चर्चा झाली, लावा तर्कचे... असे आव्हानच अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी राजकीय विश्लेषकांना दिले होते. त्याचा खरा अर्थ अॅड. कोमलताई यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीच स्पष्ट करून दाखविला. दोनच दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह आमदार रोहित पवार यांची भेट घेत त्यांनी वडील लक्ष्मणराव ढोबळे यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाट मोकळी करून घेतली. राजकीय गुरू असलेले शरद पवार यांच्याकडे शिष्याला अर्थातच आपल्या वडीलांना बोट धरून त्यांच्यापर्यंत नेऊन अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी महाराष्ट्रातील राजकारणात बापासाठी मुलगी काय करू शकते, याचे उत्तम उदाहरण सर्वांसमोर मांडले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विधानसभेसाठी नातीगोती बाजूला ठेवून उमेदवारी मागण्यासाठी राष्ट्रवादीच्या दरवाजाला धडका देणार्यांपेक्षा अॅड. कोमलताई वेगळ्या ठरल्या. यामुळेच या निर्णयामुळे खुद्द शरद पवार, सुप्रिया सुळे यांनीही अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांचे कौतूक केले आहे.
