Advertisement
बहुजन रयत परिषदे प्रदेशाध्यक्ष ऍड. कोमलताई ढोबळे-साळुंखे यांनी केले स्पष्ट
सोलापूर : कॅबिनेट मंत्री पदावरून लक्ष्मणराव ढोबळे, बबनराव पाचपुते, रामराजे नाईक निंबाळकर तर राज्यमंत्री पदावरून भास्कर जाधव, प्रकाश सोळुंके, गुलाबराव देवकर यांना २०१३ मध्ये अचानक मंत्रीपदावरुन हटविण्यात आले. त्याचवेळी पक्षातील दादागिरी उघड झाली. पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या जवळील माणसे बाजुला करण्याचे धोरण अवलंबले जात होते. याचा परिणाम म्हणून अनेक जण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडले, आदरणीय पवार साहेबांना थांबवून पक्षाप्रमुख व्हायची काहींची इच्छा होती. त्यानंतरही शरद पवार साहेबांनी अनेकांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला. अखेर तब्बल दहा वर्षानंतर म्हणजे २०२३ मध्ये राष्ट्रवादी फुटली, आज राष्ट्रवादीबाबत जे काही दिसत आहे, त्याची सुरूवात २०१३ पासून झाली. ज्यांच्यामुळे राष्ट्रवादी पक्ष सोडावा लागला तेच भारतीय जनता पक्षासोबत आले आहेत, शरद पवार साहेबांबरोबर नेहमीच अडचणीच्या काळात ढोबळे थांबले. काँग्रेसमधून बाहेर पडले त्यावेळी आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन करतानाही लक्ष्मणराव ढोबळे हे पवार साहेबांबरोबर होते, याच कारणातून आज ते पुन्हा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी करीत आहेत, कितीही राजकीय स्थित्यंतरे आली तरी त्यांच्या मैत्रीची नाळ तुटणार नाही, असे बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष ऍड. कोमलताई ढोबळे-साळुंखे यांनी स्पष्ट केले.
बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष असलेले लक्ष्मणराव ढोबळे यांनी भाजप पक्ष सोडावा, अशी मागणी करीत त्यांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दबाव आणला होता, भाजप पक्षामध्ये आपल्याला सातत्याने डावलले जात असल्याचे तसेच शरद पवार हे आपले जुने सहकारी, मित्र असल्याने तेच आपल्याला योग्य स्थान देतील, असे पदाधिकाऱ्यांनी ढोबळे यांच्या निदर्शनास आणून दिले, त्यानंतर लक्ष्मणराव ढोबळे यांनी शरद पवार यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे,
या पार्श्वभूमीवर त्यांच्या कन्या तथा बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष ऍड. कोमलताई ढोबळे-साळुंखे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, एका बहुजन नेत्याला १२ वर्षे म्हणजे एक तप राजकारण, समाजकारणातून बाहेर ठेवले गेले. ज्यांनी समाज कल्याण, उच्च शिक्षण, सामान्य प्रशासन, पणन, पीडब्ल्यूडी. खादी सामोद्योग, अन्न नागरी पुरवठा अशी खाती सांभाळली त्यांना नवख्यांच्या रांगेत बसविण्यात आले. सोलापुर लोकसभेला बोगस दाखला असलेल्या उमेदवाराला संधी दिली गेली. त्यानंतर राज्यसभा, विधानसभा, विधान परीषदेवरही डावलण्यात आले. कुठलाही अनुभव नसलेल्यांना ज्यांचे पक्षासाठी काही योगदान नाही, अशांना संधी देताना जुन्या-जाणत्या अनुभवी नेतृत्वांचा मान-सन्मान राखण्यात भाजपची मंडळी कमी पडली. ज्यांनी आपले आयुष्य समाजासाठी घालविले त्यांचे राजकीय अस्तित्वच संपविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न मनुवादी वृत्तीकडून झाला. बहुजनांचा नेता त्यांनी मोठा होऊ दिला नाही.
याउलट स्थानिक पातळीवर नवख्या पोरासोरांच्या रांगेत ढोबळे यांना बसविण्याचा प्रयत्न झाला. सतत पक्षाच्या कार्यक्रमातून डावलणे, अगदी बैनवरून फोटो काढणे, किरकोळ व्यक्तींना पाकीटं देवून आरोप करण्यास सांगणे अशी वृत्ती बळावली, आपल्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याबाबत असे प्रकार घडत असताना भाजपचे वरिष्ठ नेते गप्प बसतात यापेक्षा दुर्देव काय, एवढं सगळ होत असताना ढोबळे साहेबांनी पक्षात थांबून राहणे माझ्यासह बहुजन रयत परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनाही ते मान्य नव्हते, याच कारणातून आज ढोबळे साहेब भाजप पक्ष सोडण्याच्या निर्णयापर्यंत आले असल्याचे ऍड. कोमलताई ढोबळे-साळुंखे यांनी सांगितले.
