Advertisement
धाराशिव : तुळजापूरचे भाजपा आमदार आमदार राणा पाटील यांना भर स्टेजवर रडू कोसळल्याचं पाहायला मिळालं. तुळजापूर शहरात सुरू असलेल्या एका कार्यक्रमात हुंदके देत आमदार पाटील यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यामुळे, व्यासपाठीसह समोरील उपस्थितांमध्येही भावूक वातावरण पाहायला मिळालं. आमदार राणा पाटील हे भाजपचे विद्यमान आमदार असून ते तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकांत महायुती व महाविकास आघाडी असे चित्र निर्माण झाल्याने, त्यांच्या उमेदवारीला स्थानिक नेत्यांचाही विरोध आहे. त्यातच, गेल्याच आठवड्यात एका कार्यक्रमात स्थानिक काँग्रेस नेत्यासमवेत त्यांची वादावादी झाली होती.
तुळजापूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिक्षण महर्षी सी.ना आलुरे गुरुजी यांचे नाव देण्यात आलं आहे. या नामकरणाचा सोहळा तुळजापूरमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आलूरे गुरुजी यांच्या आठवणींना उजाळा दिला. पाटील आणि आलूरे गुरुजी या दोन कुटुंबांचे पिढ्यान पिढ्या संबंध होते. त्यांच्या आठवणीने आमदार राणा जगजित सिंह पाटील यांना भर स्टेजवर रडू कोसळले.
कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार?
राणा जगजीतसिंह पाटील हे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर मतदारसंघातून आमदार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर महायुतीकडून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला. शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी तब्बल 3 लाखांपेक्षा जास्त मतांनी अर्चना पाटील यांचा पराभव केला आहे. त्यामुळे, आता विधानसभा निवडणुकीत राणा जगजीतसिंह पाटील हे कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
