#

Advertisement

Tuesday, October 15, 2024, October 15, 2024 WIB
Last Updated 2024-10-15T16:49:30Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा

Advertisement



सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सहा जागांवर  शरद पवारांनी दावा केल्याने काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात जोरदार घमासान सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यात एकूण 11 जागा असून गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळ आणि माढा या दोन ठिकाणी आमदार निवडून आले होते. हे दोन्ही आमदार नंतर अजित पवार गटात गेले. त्यामुळे यावेळी शरद पवार गटाने माढा, मोहोळ, करमाळा, पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस आणि दक्षिण सोलापूर या मतदारसंघावर हक्क सांगितल्याने काँग्रेसच्या गोटात चिंता व्यक्त केली जात आहे. येत्या दोन दिवसात महाविकास आघाडीचे जागावाटप झाल्यानंतर कोणती जागा कोणत्या पक्षाला सुटणार यावर महाविकास आघाडीत बंडखोरी अवलंबून असणार आहे. सध्या प्रत्येक मतदारसंघात पाच पेक्षा जास्त इच्छुक असून यातील किमान चार इच्छुक कोणत्याही परिस्थितीत निवडणूक रिंगणात उतरायच्या तयारीत आहेत. 
काँग्रेसला केवळ अक्कलकोट शहरसह तीनच मतदारसंघ वाट्याला यायची शक्यता आहे. गेल्या वेळी काँग्रेसच्या जिल्ह्यात केवळ प्रणिती शिंदे या एकमेव आमदार होत्या. त्यामुळे मध्यची जागा सोडून काँग्रेसने यावेळी अक्कलकोट, शहर उत्तर, दक्षिण सोलापूर व  पंढरपूर, मंगळवेढा अशा पाच जागांवर दावा केला आहे. मात्र, पवार गटाने पंढरपूर मंगळवेढा व दक्षिण सोलापूर या दोन जागांवर हक्क सांगितल्याने काँग्रेसच्या वाट्याला केवळ तीन जागा उरत आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील एकूण 11 जागांपैकी शरद पवार गटाने सर्वाधिक सहा जागांवर हक्क सांगितला आहे. यामुळे काँग्रेसकडे तीन आणि शिवसेनेला दोन जागा मिळू शकणार आहेत. यामुळे महाविकास आघाडी जोरदार घमासान सुरू असून शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या घटक पक्षांनाही वाटाण्याच्या अक्षता मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या कोट्यातील जागा कमी करून काँग्रेस व शिवसेनेला द्याव्यात अशी या पक्षांची भूमिका आहे. अजूनही महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे घोडे अडले असून यात सोलापूर जिल्ह्यातील वाद महत्त्वाचा ठरत आहे. काँग्रेस पक्षाला सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व जागा हव्या असून राष्ट्रवादीने माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोला वगळता इतर सर्व जागा आधीच घेण्याची तयारी केली आहे. 
आता महाविकास आघाडीमध्ये दक्षिण सोलापूर, सांगोला व सोलापूर मध्य हे तीन मतदारसंघ वादाचे मुद्दे बनले आहेत. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघावर ही काँग्रेस व राष्ट्रवादी या दोघांचाही दावा आहे.