Advertisement
माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांची महायुतीच्या निर्णयावर टीका
सोलापूर : लोकसभा निवडणुकीत बसलेला फटका सहन न झाल्यामुळे महायुती बिथरली होती. आता काहीही झालं तरी महाराष्ट्राची सत्ता काबीज करायची, या हव्यासापोटी तिन्ही भावांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी सत्ता हडपण्याकरिता 'लाड़की बहीण योजना' सुरु केली. मताचा मलिदा लाटण्याकरिता सरसकट नियम, अटीकडे कानाडोळा करून दोन कोटी महिला अगिनींच्या खात्यावर पैसे टाकले आणि मत विकत घेतले. आता सत्तेची लाडकी खुर्ची मिळाली की लगेच ६० लाख लाडक्या भगिनी दोडक्या झाल्या? आता अपात्र महिलांकडून पैसे परत घेतले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. संक्रात सणाअगोदर सातवा हप्ता द्यायची फक्त वावडी उठवली. सत्ता येण्याअगोदर लाडकी बहीण योजनेचा हप्ता २१०० रुपये महिना करु, अशी घोषणा करण्यात आली पण ती हवेतच विरली, अशी टीका 'शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे केली आहे.
माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले की, केवळ सत्ता हेच अंतिम धोरण असणाऱ्या या सरकारने विधानसभेपूर्वी तिजोरीतील लोकांच्या घामाचे करोडो रुपये खर्च करून राख्या बांधून घेण्याचे मोठे-मोठे इव्हेंट घेतले. जनतेचा पैसा स्वार्थासाठी वापरला. लाडक्या बहिणींचे लाड पुरविताना गावोगावच्या पाणीपुरवठा योजना रखडल्या. तहान भागविण्यासाठी महिलांना पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागतेय. सोलापूर जिल्ह्याला तर पाच दिवसातून एकदा पाणी मिळतंय शासकीय उदासीनता आणि नियोजनशून्य कारभार यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी इथली अवस्था आहे. मिळेल तसले पाणी पिऊन तहान भागवावी लागत आहे. त्यातच जीबीएस हा नवीन आजार मध्येच उपटलाय. दूषित पाण्यामुळे हा गंभीर आजार होत आहे. पुण्यात याचे काही रुग्ण आढळलेत. शुध्द पाणी पुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. महागाई गगनाला भिडलीय. सर्वसामान्यांचं जगणं मुश्कील झाल आहे. लाडक्या बहिणी हे सगळं तिन्ही भावांसाठी हसत हसत सहन करतायत, मात्र सत्ता मिळताच या आवांना आपल्या लाडक्या बहीण दोडक्या झाल्या आहेत. त्यांना बहिणींची नाहीतर आता तिजोरीची काळजी वाटू लागलीय. म्हणूनच ते लाडक्या बहिणींना दिलेले पैसे परत मागत आहेत.
मुळात ही योजना राजकीय स्वार्थासाठी सुरु केली, हे उघड सत्य आहे. सुरुवातीपासून लाडकी बहीण योजनेचे जे निकष होते ते तपासूनच या योजनेचा लाभ दिला पाहिजे होता. पण जास्तीत जास्त मते मिळविण्यासाठी अधिक निकष न लावता या योजनेचा लाभ सरसकट देण्यात आला. ही सरकारची चूक आहे. म्हणजे योजना अशी करायची की आधी लाभ दद्यायचा मग निकष लावायचे आणि अपात्र ठरवायचं. हे सर्व गैर आणि नियम डावलून केलेले आहे. त्यामुळे मुळात सरकार यात दोषी आहे. याबाबत नुकतेच अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे की, 'रक्षाबंधनाचे पावित्र्य जपावे. लाडक्या बहिणींना दिलेले पैसे परत घेऊ नये. त्यांनी घेतलेला हा निर्णय 2 कोटी महिलांना दिलासा देणारा असला तरी त्या निर्णयाची योग्य अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असे ही माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी म्हटले आहे.
