Advertisement
महामंडलेश्वर होताच ममता कुलकर्णीवर मोठी कारवाई
प्रयागराज : बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीची 24 जानेवारी रोजी महाकुंभमध्ये किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या निर्णयावर अनेक साधू संतांनी आक्षेप नोंदवला होता. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्या निर्णयामुळे किन्नर आखाड्यात फूट पडली होती. किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी आता बंड पुकारलं आहे. त्यांनी लक्ष्मी यांच्या निर्णयाचा विरोध करत ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पदावरुन हटवण्यात आलं आहे. पण त्यांचा निर्णय मानण्यास अनेकांनी विरोध केला आहे.
ऋषी अजय दास यांनी सांगितलं आहे की, ममताला किन्नर आखाड्यात प्रवेश देणाऱ्या लक्ष्मी नारायण त्रिपाठीलाही आचार्य महामंडलेश्वर पदातून मुक्त करण्यात आलं आहे. लवकरच नव्या आचार्य महामंडलेश्वरांची घोषणा केली जाईल असं ते म्हणाले आहेत.
महामंडलेश्वर होण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागते. प्रथम दीक्षा घ्यावी लागते, मग बराच काळ तपश्चर्या करावी लागते आणि सांसारिक जीवनाचा त्याग करावा लागतो. जो महामंडलेश्वर बनतो तो संन्यासी असला पाहिजे. पण ममता यांचं आयुष्य वादांनी वेढलेले आहे. तिचे ड्रग माफिया विक्की गोस्वामीशी संबंध होते आणि दोघांनीही लग्न केले होते. दुबईमध्ये ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली विकीला 12 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. एका प्रकरणात ममताच्या विरोधातही अटक वॉरंट जारी करण्यात आला होता. पण ममता म्हणते की विकीसोबतच्या तिच्या संबंध आणि लग्नाच्या चर्चा खोट्या आहेत. ममतावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचाही आरोप आहे.
