Advertisement
उमरगा : विधानसभेचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या जातीच्या प्रमाणपत्राविरोधात माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेत प्रवीण स्वामींचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात या प्रकरणाची फेब्रुवारीमध्ये सुनावणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
उमरग्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार प्रवीण स्वामी यांची आमदारकी धोक्यात आहे का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहे. विधानसभेच्या निवडणूकीतील पराभूत उमेदवार माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी या याचिकेसह प्रवीण स्वामी यांच्याविरुद्ध इलेक्शन पिटीशनही दाखल केली आहे. चौगुले यांनी निवडणुकीचे निर्णय आणि तांत्रिक बाबींवर 16 2025 या क्रमांकाची इलेक्शन पिटीशन दाखल केली आहे.
याप्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी यांना संभाजीनगर उच्च न्यायालयाकडून नोटीस देण्यात आली आहे. उमरगा विधानसभा मतदारसंघ आरक्षित असल्याने या ठिकाणी प्रवीण स्वामी यांना संधी मिळाली आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे तत्कालीन आमदार ज्ञानराज चौगुले यांचा पराभव केला होता.
