Advertisement
पालकमंत्री गोरे यांच्याकडून मंत्री ढोबळे यांच्या निवेदनाची तातडीने दखल
सोलापूर : मोहोळ एसटी बसस्थानकाची सध्याची जागा अपुरी पडत असल्याने तसेच प्रवशा्ंना योग्य त्या सुविधा मिळत नसल्याने या स्थानकाचे सुशोभिकरण तसेच विस्तारीकरण आवश्यक असल्याने सध्याच्या बसस्थानकामागील प्रशस्त शासकीय जागेमध्ये सर्वसोयींयुक्त स्थानक उभारावे, अशी मागणी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी शासनाकडे केली आहे. या बाबतचा ते सातत्यााने पाठपुरावा करीत आहेत. यानुसार पालकमंत्री जयकुमार गोरे यांनाही ढोबळे यांनी निवेदन दिले, त्याच्या अंमलबजावणीचे निर्देश पालकमंत्र्यांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
मोहोळ हे तालुक्याचे आणि सोलापूर जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. येथील बसस्थानकाजवळून मुंबइ- हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग जातो. त्याचे रुंदीकरण २०१२ मध्ये झाले आहे. याशिवाय पंढरपूर-आळंदी हा पालखी मार्ग देखील स्थानकाशेजारूनच जातो, या मार्गाचे विस्तारीकरण आणि रुंदीकरण सध्या सुरू आहे. यामुळे सध्याच्या मोहोळ बसस्थानकाची जागा अतिशय तोकडी आणि कमी झाली आहे. येथूनच मुंबई, नगर, पुणे, ठाणे, कोल्हापूर, विदर्भ अशा लांब पल्ल्याच्या एसटी बस जातात. पंढरपूर आणि सोलापूर याठिकाणी शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही जास्त आहे. तसेच, वाढती प्रवासी संख्या आणि सध्याच्या बसस्थानकाची अपुरी जागा यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे, शिवाय अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे सध्या असलेल्या एसटी बसस्थानकाच्या पाठीमागील शासकीय जागेत तलाठी महासंघ आणि पी.डब्ल्यू.डी.चे कार्यालय आहे, याठिकाणी अजूनही जागा शिल्लक आहे. त्या जागेवर बसस्थानक स्तलांतरित केल्यास जास्त संख्येने एसटी बस गाड्या उभ्या राहू शकतील आणि प्रवाशांसाठी देखील चांगल्या सोयी उपलब्ध करून देता येऊ शकतील. याबाबत लोकभावना लक्षात घेऊन प्रवाशांच्या हिताचा निर्णय घ्यावा, अशी विनंती माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी पालकमंत्री गोरे यांना केली होती. याची तातडीने दखल घेत यासंदर्भातील पुढील कार्यवाही करणेबाबत पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.
