Advertisement
मुंबई : कोकणात विधानसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर त्यात राजन साळवी यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याने ठाकरे गटासाठी हा मोठा झटका मानला जात आहे. या पडझडीवरून ठाकरे गटावर त्यांच्या एकेकाळच्या सहकाऱ्यांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आता ठाकरे गटात हम दो आणि हमारे दो राहतील, अशी टीका शहाजी बापू पाटील यांनी केली आहे.
शहाजी बापू पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली आहे. आम्ही गुहाटीला गेलो त्याच वेळेस उद्धव ठाकरेंचं भविष्य संपलेले होतं. त्यांना संधी दिली होती, मात्र त्यांनी आपण निष्क्रिय आहोत हेच महाराष्ट्राला दाखवून दिलं, असा दावा माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला आहे. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहे, हे निवडणुकीनंतर राजन साळवी यांना समजले म्हणून त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश करायचा निर्णय घेतला आहे. येत्या सहा महिन्यात उबाठा गटामध्ये कोणीच शिल्लक राहणार नाही. टप्प्याटप्प्याने सगळेच खऱ्या शिवसेनेत प्रवेश करतील. उद्धव साहेब हे संजय राऊत यांच्या नादाला लागल्यामुळे भविष्यात ते एकाकी पडतील, असा दावा शहाजी बापू यांनी केला आहे.
संजय राऊत हा सकाळचा भोंगा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्लज्जम सदासुखी ही बिरुदावली फक्त आणि फक्त संजय राऊत यांनाच शोभून दिसते. शरद पवार साहेबांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला, हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक चांगलं उदाहरण म्हणून याकडे पाहणे गरजेचे होते. दुर्दैवानं संजय राऊत यांनी या कार्यक्रमाकडे अतिशय खालच्या नजरेने पाहिले. पवार साहेब हे राजकारणातील विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. तर संजय राऊत हा राजकारणातील अंगणवाडीत खेळणारा वात्रट पोरगा आहे, अशी खोचक टीका शहाजी बापू यांनी केली आहे.
