Advertisement
सभागृहात आदिती तटकरेंची माहिती
मुंबई : लाडकी बहीण योजनेत यंदाच्या अर्थसंकल्पात 2100 रुपये देणार असल्याची घोषणा आम्ही केलेली नाही. असं वक्तव्य महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानपरिषदेत केलं आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींची निराशा होण्याची शक्यता आहे.
लाडक्या बहिणीवर अन्याय होणार नाही तसेच महिलांकडून लाभ परत घेण्याची कोणतीही भूमिका शासनाची भूमिका नाही असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. महायुतीच्या जाहिरनाम्यात 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं ते कधी देणार अशी विचारणा विरोधकांनी केली. त्यावर उत्तर देताना आदिती तटकरे यांनी जाहीरनामा हा पाच वर्षांचा असतो त्यामुळे अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री जेव्हा प्रस्तावित करतील तेव्हापासून लाडक्या बहिणींना विभागाकडून हा लाभ देण्यात येईल असं अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान अपात्र लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात आले असं महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं. ज्या महिलांना 65 वर्ष पूर्ण झाली आहेत त्या आपोआपच या योजनेतून अपात्र होणार आहेत. तसेच काही महिला विवाह करून दुसऱ्या राज्यात गेल्या त्या महिला अपात्र ठरल्या असं आदिती तटकरे यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे बनावट खाती वापरून ज्यांनी नोंदणी केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या त्यावर कारवाई करण्यात आली असं अदिती तटकरे यांनी सांगितलं.
