Advertisement
करुणा शर्मा यांनी स्पष्टच सांगितले कारण
परळी : धनंजय मुंडे यांच्या विरोधात करुणा शर्मा यांनी केलेल्या तक्रारीवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या 4 एप्रिलला आता पुढील सुनावणी होणार आहे. परळी न्यायालयात ही सुनावणी झाली. विधानसभा निवडणुकीत मुंडे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात दुसऱ्या पत्नीची माहिती लपवल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर तोफ डागली आहे. तसेच मुंडे यांच्याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. येत्या सहा महिन्यात धनंजय मुंडे यांची आमदारकीही जाईल, असं भाकीतच करुणा शर्मा यांनी केलं आहे.
करुणा शर्मा यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. धनंजय मुंडे यांनी निवडणुकीत 200 बुथ कॅप्चर केले होते. हे सर्वांना माहीत आहे. निवडणुकीत शपथपत्रात त्यांनी माझं नाव टाकलं नव्हतं. आमच्या केसचा संदर्भही दिला नव्हता. 2014 पासून त्यांनी माझं आणि माझ्या मुलाबाळांचं नाव टाकलं नाही. धक्कादायक म्हणजे निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनीही त्यावर काही आक्षेप घेतला नाही, असं करुणा शर्मा म्हणाल्या. याच प्रकरणावर माझी लढाई सुरू आहे. आता त्याचे वॉरंट निघेल. त्यांना सहा महिन्यांची शिक्षा होईल. धनंजय मुंडेंना जावं लागेल. धनंजय मुंडेंचं मंत्रीपद जाणार हे मी जसं बोलले होते, तसंच सांगते की येत्या सहा महिन्यात त्यांची आमदारकी जाईल, असा दावाही करुणा यांनी केला.
यावेळी त्यांनी सतिश भोसले उर्फ खोक्यावरही भाष्य केलं. मी त्यांना 100 टक्के भेटले आहे. एका बँकेच्या उद्धाटनावेळी भेटले होते. आमची दोन वेळा भेट झाली होती. मला नाथगडावर दर्शनाला जायचे होते. तेव्हा मला गुंडांनी थांबविलं होतं. तेव्हा हा खोक्या भाऊ आला आणि मला घेऊन गेला. माझा सत्कार करण्यासाठी एकदा मुंबईच्या घरी आला होता. माझ्या नवऱ्याचे लोक मला आडवतात आणि खोक्या भाऊ मला दर्शनाला घेऊन गेला याचा मला अभिमान वाटला होता, असंही त्या म्हणाल्या.
