Advertisement
मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाथ्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र जयंत पाटील यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी एक वक्तव्य केलं होतं. माझं काही खरं नाही, माझी ग्यारंटी घेऊ नका असं त्यांनी म्हटलं होतं, यावरून पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली, आता त्यावर देखील त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
मी नाराज वैगरे काही नाही, तशीही मला बाहेर बोलायची चोरी झाली आहे. मी भाषण केलं त्याचा रेफरन्स बघा. शक्तीपीठ रस्त्यासाठी जो मोर्चा काढण्यात आला, त्यांच्यासमोर भाषण करताना मी ते म्हंटलो होतो. राजू शेट्टी यांनी झेंडा हातात घेतलाय म्हंटल्यावर काही काळजीच कारण नाही. हा विनोदाचा भाग होता. राजू शेट्टी यांचा आमच्यावर विश्वास नाही, त्यांना आम्ही उभं राहायला सांगत होतो. ‘त्यामुळे माझे तुम्ही गृहीत धरू नका, खरं धरू नका तुम्ही तुमचं आंदोलन सुरू ठेवा. तुमच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे,’ अशी त्यामागची भावना होती, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान आम्ही एका कुटुंबातील सर्वजण आहोत, आम्ही कुणाला इशारा देत बसत नाही. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष आहे, जो काय निर्णय घ्यायचा आहे तो पक्षाच्या हिताचाच घेऊ, त्यामुळे मी इकडे जाणार तिकडे जाणार हा विषय होऊ शकत नाही, आणि होणारही नाही, असंही यावेळी जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
