Advertisement
मुंबई : रायगड, नाशिक, वाशिमच्या पालकमंत्री पदाच्या वादाने महायुतीने स्वत: जवळ निखारे तर ठेवले नाही ना? असा सवाल आता विचारण्यात येत आहे. पालकमंत्री पदावरून सध्या महायुतीत लाथाळ्या दिसून येत आहे. तीन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रायगड दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांमध्ये दिलजमाईचा प्रयत्न केला. आम्ही तिघे रायगडचे पालकमंत्री असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. पण त्यांनी पाठ फिरवताच पालकमंत्री पदाचा वाद उफाळला आहे.
रायगडमध्ये शिंदे गटाचे नेते भरतशेठ गोगावले हे पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत. त्यांनी यापूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर त्यांनी चांगलेच तोंडसुख घेतले होते. पालकमंत्री पदावरून रायगडमध्येच नाही तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये धुसफूस सुरू आहे. नाशिकमध्ये पण अशीच स्थिती आहे. दुसरीकडे मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिमला रामराम ठोकला आहे. त्यामुळे महायुतीत पालकमंत्री पदावरून हट्ट आणि रूसवे, फुगवे सुरू असल्याचे दिसून येते. इतकेच नाही तर रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद टोकाला गेल्याचे दिसून आले. सुनील तटकरे यांचे नाव न घेता, आजचा औरंगजेब हा सुतारवाडीत बसल्याचा घणाघात शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे पालकमंत्री पदावरून महायुतीवर नव्याने संकट आले आहे.
