Advertisement
आंतरराष्ट्रीय परिषद मान्यवरांच्या उपस्थितीत चर्चा
लंडन : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे तसेच मुंबई विद्यापीठ आणि ग्रेस इन, युके यांच्या संयुक्त विद्यमाने लंडनमध्ये येथे आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर आणि त्यांच्या विचारांवर आधारित चर्चा करण्यात आली, यावेळी भारतीय संविधानातील डॉ. बाबासाहेबांची भूमिका यावरही चर्चा करण्यात आली, हे चर्चासत्र दिशादर्शक ठरल्याचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी सांगितले.
लंडनमधील ग्रेस इन येथे ता. २४ आणि २५ एप्रिलला आंतरराष्ट्रीय परिषद मान्यवरांच्या उपस्थितीत झाली. ही प्रतिष्ठित परिषद महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे, मुंबई विद्यापीठ आणि ग्रेस इन, यूके यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जाते. यामध्ये सन्मानीय पाहुणे माजी मंत्री ढोबळे यांना आमंत्रित करण्यात आले होते.
यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य करणाऱ्या जगातील अनेक नामवंत विचारवंतांनी सहभाग घेतला. या परिषदेस मा.एल.मृगन (केंद्रिय राज्यमंत्री-माहिती व प्रसारण,संसदिय कार्य) व महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री मा संजय शिरसाट हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच डॉ.बाबासाहेब यांच्या जीवनकार्यावर संशोधन करणाऱ्या संशोधकांचे संशोधन प्रबंध या ठिकाणी प्रसिध्द करण्यात आले.
या परिषदेत डॉ. आंबेडकर यांच्या कायद्याशी संबंधित योगदान, सामाजिक न्यायाची कल्पना आणि आर्थिक धोरणांवर चर्चा केली करण्यात आली. विशेषतः त्यांच्या लंडनमधील शिक्षणाचा प्रभाव या विषयावर भर देण्यात आला. या परिषदेत जगभरातील शास्त्रज्ञ, अभ्यासक, धोरणकर्ते आणि कायदेतज्ज्ञ सहभागी झाले होते.
यामध्ये प्रमुख विषयांत आंबेडकरांचे कायदेशीर योगदान, समावेशक विकास, सामाजिक न्याय चळवळी आणि आजच्या काळातील त्यांचे विचार किती लागू आहेत, यावर आधारित चर्चा अवलोकन करण्यात आले. याबाबत माजी मंत्री ढोबळे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्याय व समानतेच्या क्षेत्रात दिलेले योगदान अमूल्य आहे. ज्या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतले, तिथे जाऊन त्यांच्या विचारांवर चर्चा करण्याची संधी मिळणे, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची शिवाय जबाबदारीची बाब आहे. उद्योजकता विकास, युवक सशक्तीकरण आणि सामाजिक न्याय क्षेत्रात कार्यरत असलेल्यांच्या उपस्थितीत चर्चा घडली.