Advertisement
मुंबई : देशातील पाकिस्तानी नागरिकांना पाकिस्तानात हाकला या मोहिमेचा शुभारंभ केंद्र सरकारने केला खरा; पण जेथे वर्षानुवर्षे भाजपची सत्ता आहे तेथेच सर्वाधिक पाकिस्तानी सापडत आहेत. म्हणजे इतकी वर्षे या लोकांनी झोपाच काढल्या हे नक्की. पुन्हा जेथे भाजपची सत्ता नाही किंवा आहे तेथे मुसलमान विद्यार्थी, फळवाले, भाजीवाले, कपडेवाले, लहान-मोठे व्यावसायिक यांना पाकिस्तानी नागरिक ठरवून त्यांना त्रास देण्याच्या मोहिमा सुरू केल्या जात आहेत. त्यामुळे मूळ पाकिस्तानी नागरिक, घुसखोर राहिले बाजूला; वेगळेच उद्योग सुरू झाले आहेत, असं म्हणत उद्धवठाकरेंच्या शिवसेनेनं संताप व्यक्त केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सूचना देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्यानंतर प्रत्येक राज्यातून पाकिस्तान्यांची पाठवणी सुरू झाली. रविवारी सायंकाळी ही मुदत संपली तेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत असंख्य पाकिस्तानी नागरिकांना अट्टारी सीमेवरून त्यांच्या देशात हाकलण्यात आले. मात्र ही मुदत संपल्यानंतरही हजारो पाकिस्तानी नागरिक देशात तळ ठोकून असल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर काढण्यात आले ते योग्यच आहे, पण त्यासाठी पहलगामसारख्या हल्ल्याची वाट पाहण्याची काय गरज होती, हा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे व तो चुकीचा नाही," असं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे.
मुळात हजारोंच्या संख्येने पाकड्यांनी हिंदुस्थानात येऊन का राहावे आणि आपल्या देशानेही त्यांना येऊ का द्यावे? आपण पाकिस्तानला शत्रुराष्ट्र मानतो ना, मग देशाच्या प्रत्येक राज्यात इतक्या प्रचंड संख्येने पाकिस्तानी नागरिक वैध, अवैध मार्गाने का येऊ दिले गेले? बरं, यापैकी किती पाकिस्तानी नागरिकांकडे व्हिसा व अन्य वैध कागदपत्रे आहेत व किती लोक बेकायदेशीरपणे घुसखोरी करून हिंदुस्थानात राहत आहेत, हादेखील संशोधनाचा विषय आहे.