Advertisement
ताफ्यावर फेकल्या चुन्याच्या डब्या
परभणी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना शनिवारी शेतकऱ्यांच्या रागाचा सामना करावा लागला. अजित पवार शनिवारी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांनी चक्क चुन्याच्या डब्या फेकल्याची घटना घडली. यामुळे सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस आणि चुन्याच्या डब्या फेकऱ्या शेतकऱ्यांमध्ये काही काळ बाचाबाची झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र अजित पवारांचा ताफा निघून गेल्यानंतर वातावरण शांत झालं. तरीही शेतकऱ्यांनी अशाप्रकारे अजित पवारांच्या कारसमोर चुन्याच्या डब्या फेकण्यामागे त्यांचं एक विधान कारणीभूत आहे.
नृसिंह पोखरणी येथे दर्शन घेतल्यानंतर अजित पवार जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक घेण्यासाठी जात असताना त्यांच्या ताफ्यासमोर चुन्याच्या डब्या फेकण्यात आल्या. किसानसभा आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या ताफ्यावर चुन्याच्या डब्या फेकून अजित पवारांनी शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. यावेळी आंदोलकांनी अजित पवार आणि सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अजित पवारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी वरून केलेल्या वक्तव्यानंतर शेतकरी संतप्त झाले होते. त्यांनी 'अजित पवार मुर्दाबाद' अशी घोषणाबाजी करत उपमुख्यमंत्र्यांच्या विधानाचा निषेध करतानाच शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे, अशी मागणी केली.
अजित पवार नेमकं काय म्हणालेले?
अजित पवारांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांबद्दल केलेल्या विधानाचा निषेध करण्यासाठी त्यांच्या ताफ्यावर चुन्याच्या डब्या फेकण्यात आल्या. पीक विम्यात आम्हाला अनेकांनी चुना लावल्याचं अजित पवारांनी कर्जमाफीवरून टोला लगावताना म्हटलेलं. 1 रुपया पीक विमा योजनेत अनेकांनी आम्हाला चुना लावला, असे वक्तव्य अजित पवारांनी जाहीरपणे केले होते. त्याचेच पडसाद शनिवारी परभणीतील आंदोलनात दिसून आले. पोलिसांनी अजित पवारांच्या ताफ्यावर चुन्याच्या डब्या फेकणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेतलं असून त्यांना नवा मोंढा पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आलं.